बससाठी डावी लेन ठेवा
By admin | Published: March 14, 2016 01:32 AM2016-03-14T01:32:15+5:302016-03-14T01:32:15+5:30
पीएमपी बस रस्त्याच्या मध्यभागातून जातात. त्या रस्त्याच्या मध्येच थांबल्याने अनेकदा अपघात होण्याची शक्यता असते़ तसेच मागील वाहनांना पुढे जाण्यास जागा राहत
पुणे : पीएमपी बस रस्त्याच्या मध्यभागातून जातात. त्या रस्त्याच्या मध्येच थांबल्याने अनेकदा अपघात होण्याची शक्यता असते़ तसेच मागील वाहनांना पुढे जाण्यास जागा राहत नसल्याने वाहतूककोंडी होते़ यामुळे बससाठी खास रस्त्याच्या डाव्या बाजूला एक लेन करावी, असा प्रस्ताव मनसेचे पुष्पा कनोजिया व राजू पवार यांनी शहर सुधारणा समितीमध्ये दाखल केला आहे.
शहरामध्ये बस व इतर वाहनांसाठी लेन सिस्टिम नाही. यामुळे बसेस व इतर वाहने रस्त्यावर मिळेल त्या बाजूने जातात. अनेकदा बस मध्यभागातून जातात. बसथांबा जवळ आल्यावर अचानक डाव्या बाजूला वळतात. रस्त्याच्या डाव्या बाजूला इतर वाहने असल्यास बस मध्यभागी थांबवली जाते. तसेच बस थांब्याच्या पुढे किंवा मागे बस थांबवली जाते. कर्वे रोडवर पीएमपीने काही दिवस डाव्या बाजूने बस नेण्याचा प्रयोग राबविला होता़ त्याला चांगले यशही आले होते़ पण, त्यात सातत्य न राहिल्याने पुन्हा या रस्त्यावरील बस कशाही जाऊ लागल्या आहेत़
बससाठी रस्त्याची डावी बाजू राखीव ठेवावी, असा प्रस्ताव शहर सुधारणा समितीमध्ये सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव अभिप्रायसाठी पालिका प्रशासनाकडे पाठवला आहे. प्रशासनाचा अभिप्राय आल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. याबाबत मनसेच्या नगरसेविका पुष्पा कनोजिया यांनी सांगितले की, बस रस्त्यामध्ये कोठेही थांबते. यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची गैरसोय होते. बस मध्यभागातून जात असल्याने वाहतूककोंडी व अपघाताच्या घटना घडतात. यामुळे बससाठी रस्त्याची डावी बाजू राखीव ठेवावी. यासाठी नियमावली करण्याची गरज आहे.