प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी दारू दुकाने बंद ठेवा; पुण्यातील देवस्थानांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
By विश्वास मोरे | Published: January 17, 2024 05:30 PM2024-01-17T17:30:54+5:302024-01-17T17:32:01+5:30
प्राणप्रतिष्ठापना सोहळा या पवित्र दिनी पुणे जिल्ह्यातील सर्व दारूची दुकाने बंद ठेवून हा पवित्र दिवस राष्ट्रीय सणाप्रमाणे साजरा करावा
पिंपरी: श्रीक्षेत्र अयोध्या येथे श्री राम मंदिरामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. त्यामुळे दिनांक २२ जानेवारीला पुणे जिल्ह्यातील सर्व दारू दुकाने व मांस विक्री दुकाने बंद ठेवावीत, अशी मागणी देवस्थानांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अयोध्येतील श्री प्रभू रामचंद्र मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना सोहळा येत्या २२तारखेला होणार आहे. त्यानिमित्ताने देशभर विविध कार्यक्रम होणार आहेत. हा दिवस सण उत्सवासारखा साजरा करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील विविध तीर्थक्षेत्राच्या विश्वस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.
मावळ तालुक्यातील श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टच्या व सर्व वारकरी संप्रदायातील भाविकांच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
काशीद म्हणाले, येत्या दिनांक. २२ जानेवारीला देशवाशियांचे स्वप्न, श्री क्षेत्र अयोध्या येथे श्री राम मंदिरामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा होऊन पूर्ण होणार आहे. हा पवित्र क्षण संपूर्ण भारत देशामध्ये मोठ्या मांगलिक वातावरणात साजरा होणार आहे. या पवित्र दिनी आपल्या पुणे जिल्ह्यातील सर्व दारूची दुकाने व मांस विक्रीची दुकाने बंद ठेवून हा पवित्र दिवस राष्ट्रीय सणाप्रमाणे साजरा करावा. या दिवशी सर्व दारू व मांस विक्री दुकानदारांना सरकारी आदेश द्यावेत, दारूची दुकाने बंद ठेवावी.