पोस्टल मतपत्रिका जैसे थे ठेवा
By Admin | Published: March 25, 2017 03:26 AM2017-03-25T03:26:49+5:302017-03-25T03:26:49+5:30
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एका मताने विजयी म्हणून घोषित केलेले आळे-पिंपळवंडी गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार शरद लेंडे यांच्या निवडीबाबत सत्र न्यायालयात
नारायणगाव : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एका मताने विजयी म्हणून घोषित केलेले आळे-पिंपळवंडी गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार शरद लेंडे यांच्या निवडीबाबत सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने पोस्टल मतपत्रिका नष्ट न करता जतन करून जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत़ पुढील सुनावणी दि़ ५ एप्रिल २०१७ रोजी होणार आहे़, अशी माहिती अॅड़ योगेश जाधव यांनी दिली़
शिवसेनेचे उमेदवार मंगेश काकडे यांच्या वतीने राष्ट्रवादीचे उमेदवार शरद लेंडे यांच्या निवडीला आव्हान देऊन खेड सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे़ या याचिकेच्या सुनावणीकरिता न्यायालयाने तातडीची प्रोसिजर जारी करून राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी पुणे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे व निवडणूक निर्णय अधिकारी यांना इमर्जन्सी बेलिफमार्फत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते़
निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांच्या वतीने जुन्नरच्या तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आशा होळकर न्यायालयात हजर झाल्या होत्या़ तर, लेंडे यांच्या वतीने अॅड़ दौंडकर व राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी पुणे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने सरकारी वकिलांनी काम पाहिले़ (वार्ताहर)