अमूल्य ठेवा एनएफएआयकडे
By admin | Published: July 6, 2017 03:49 AM2017-07-06T03:49:11+5:302017-07-06T03:49:11+5:30
राजा परांजपे, सुलोचनादीदी, इंदिरा संत, बेबी शकुंतला, कुसुम देशपांडे, राजा गोसावी अशा अनेक मोठ्या कलाकारांची चित्रपटांमधील छायाचित्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राजा परांजपे, सुलोचनादीदी, इंदिरा संत, बेबी शकुंतला, कुसुम देशपांडे, राजा गोसावी अशा अनेक मोठ्या कलाकारांची चित्रपटांमधील छायाचित्रे ७० वर्षांनंतर समोर आली आहेत. जागा भाड्याने देणे आहे (१९४९), वर पाहिजे (१९५०), शारदा (१९५१), नरवीर तानाजी (१९५२), इन मीन साडेतीन (१९५४), तीन मुले (१९५४) अशा मराठी चित्रपटांचा समृद्ध वारसा दर्शविणाऱ्या चित्रपटांमधील प्रसिद्ध छायाचित्रकार सदानंद आजरेकर यांनी काढलेल्या छायाचित्रांचा अमूल्य ठेवा त्यांची कन्या शांभवी बाळ यांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्त केला.
आजरेकर यांनी काढलेली ही छायाचित्रे त्यांच्या कन्या शांभवी बाळ यांनी आस्थेने जपून ठेवली होती. १९४२ ते १९५६ या कालावधीत काढलेली ही छायाचित्रे कलात्मकतेचा उत्कृष्ट नमुना आहेत. आजरेकर हे चित्रपटसृष्टीत ‘जॉनी’ या नावाने प्रसिद्ध होते. आचार्य अत्रे व मास्टर विनायक यांच्या नवयुग स्टुडिओमध्ये तसेच प्रभात फिल्म कंपनीमध्ये ते छायाचित्रकार म्हणून काम करत होते. या काळात विविध चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान काढलेल्या छायाचित्रांचा यामध्ये समावेश आहे. आजरेकर यांनी १९५६ नंतर वैयक्तिक स्तरावर छायाचित्रणाचे काम सुरू केले. त्यासाठी त्यांनी टिळक रस्त्यावर अशोक स्टुडिओ सुरू केला.
या काळातीलही छायाचित्रे यामध्ये आहेत. या छायाचित्रांमुळे मराठी चित्रपटांचा मोठा पट
उलगडला गेला आहे.
‘संग्रहालयात प्रशिक्षण घेणाऱ्या रुची शेवडे या विद्यार्थिनीमुळे हा ठेवा उपलब्ध झाला आहे. सर्व छायाचित्रांचे डिजिटायझेशन करणार आहोत. एक हजारपैकी पाचशे छायाचित्रे ओळखता येत असून उर्वरित छायाचित्रांची ओळख पटविण्यासाठी चित्रपट अभ्यासकांची मदत घेतली जाईल,’ अशी माहिती संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम
यांनी दिली.
बाबांनी १.२० एमएमची ही छायाचित्रे रोलिफ्लेक्स कॅमेऱ्यातून काढली असण्याची शक्यता आहे. बाबा काम करीत होते, तेव्हा मी लहान असल्यामुळे तेव्हा फारशी जाणीव नव्हती; पण नंतर हा किती मोठा ठेवा आहे, ते समजत गेले. बाबांच्या पश्चात अनेक वर्षे ठेवा जपून ठेवला; पण तो यापुढेही सुरक्षित राहावा, यासाठी संग्रहालयाकडे सुपूर्द केला आहे. छायाचित्रण करताना प्रकाश किती असला पाहिजे, कोणती लेन्स वापरली पाहिजे, यासाठीची बारीक नजर बाबांकडे होती, म्हणूनच अत्यंत सुंदर कलाकृती ठरतील, अशी ही छायाचित्रे आकार घेऊ शकली.
- शांभवी बाळ