शांतता ठेवा अन्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:09 AM2021-01-10T04:09:46+5:302021-01-10T04:09:46+5:30
सांगवी: निवडणुकीदरम्यान गावात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दोन्ही पॅनेलकडून काळजी घ्यावी. लोकांनी एकत्र येऊन गोंधळ घालत कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण ...
सांगवी: निवडणुकीदरम्यान गावात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दोन्ही पॅनेलकडून काळजी घ्यावी. लोकांनी एकत्र येऊन गोंधळ घालत कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच, पुढील निवडणुकीदरम्यान प्रतिबंधात्मक कारवाई करून संबंधितांना हद्दपार करण्यात येईल, असा इशारा माळेगाव दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक महेश विधाते यांनी दिला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ व पोलिसांची आढावा बैठक पार पडली, यावेळी विधाते बोलत होते. यावेळी बारामती दूध संघाचे संचालक प्रकाश तावरे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब तावरे, बारामती तालुक्याचे संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष किरण तावरे, शिवनगर विद्या प्रसार मंडळाचे विश्वस्त महेश तावरे,बारामती तालुका भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष युवराज तावरे, पोलीस हवालदार राजेंद्र शेंडगे, जयंत ताकवणे, सुरेश दडस,माजी उपसरपंच भानुदास जगताप आदी उपस्थित होते. विधाते म्हणाले, निवडणूक ही निवडणुकीप्रमाणे लढवून लोकांनी मनातील रोष बाजूला ठेवा, घोळका करून भांडणे करू नका असे केल्यास पोलीस कारवाई होऊन आयुष्यभर पोलीस रेकॉर्डवर राहावे लागेल. बुधवारी (दि.१३) रोजी निवडणुकीचा प्रचार बंद होणार आहे. यामुळे उमेदवारांचे लावण्यात आलेले फ्लेक्स वेळीच उतरून घ्यावे, यामुळे निवडणुकीचा प्रचार प्रसार होणार नाही, याकडे लक्ष द्या. कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी. असे आवाहन करत निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार, सभा दरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांकडून परवानगी घ्या, बेकायदेशीर सभा घेऊ नका. यातून ताणतणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते असे विधाते म्हणाले. तसेच यावेळी ग्रामस्थांनी देखील आपली मते मांडली.
सांगवी ग्रामस्थांशी संवाद साधताना सहायक पोलीस निरीक्षक महेश विधाते व इतर
०९०१२०२१-बारामती-०२