संकटांशी दोन हात करून हसत राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:10 AM2021-03-20T04:10:04+5:302021-03-20T04:10:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मागील वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचे अनपेक्षित संकट जगावर ओढवले. साथीच्या संकटाचे आरोग्याइतकेच विपरीत परिणाम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मागील वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचे अनपेक्षित संकट जगावर ओढवले. साथीच्या संकटाचे आरोग्याइतकेच विपरीत परिणाम मानसिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक स्तरावरही धडका देत आहेत. आपल्या भवतालच्या अनेकांनी या संकटात खूप काही गमावले, आणि तरीही नाउमेद न होता भवताली ‘आनंदाचं झाड’ फुलवण्याचा प्रयत्न केला. ‘जागतिक आनंद दिवसा’चे औैचित्य साधून ‘लोकमत’ने अशा व्यक्तींच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न केला.
आनंदाच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. एखाद्याचा आनंद बाह्य गोष्टींवर अवलंबून असतो, तर एखादी व्यक्ती कोणत्याही संकटाला आनंदानेच सामोरी जाते. ‘होत्याचे नव्हते’ होत असतानाही संकटाशी दोन हात कसे करायचे, याचे गुपित कळले आणि निर्धार पक्का असेल तर जगण्याचा संघर्षही आनंददायी होतो, हे त्यांच्याशी साधलेल्या संवादातून जाणवले. परिचारिका, कलाकार, सफाई कामगार यांच्याशी संवाद साधण्यात आला.
प्राची पाटील ही खाजगी दवाखान्यात परिचारिका आहे, तर पती रिक्षा चालवतो. घरात सासू, सासरे, आजेसासू आणि मुलगी इतके सदस्य. एप्रिल महिन्यात लॉकडाऊनमुळे पतीचे काम पूर्णपणे थांबले. तिच्या एकटीच्या पगारावर संसाराचा डोलारा सांभाळण्याची वेळ आली. त्यातच सासू, सासरे, पती आणि आजेसासूला ऑगस्ट महिन्यात कोरोनाने गाठले. २०-२२ तासांची ड्युटी, घरातल्या जबाबदाऱ्या आणि त्यात कोरोना, अशा परिस्थितीत तिने हार मानली नाही. आजेसासूला ससून रुग्णालयात तर सासू-सासरे आणि नवऱ्याला कोव्हिड केअर सेंटरला दाखल केले. मुलीला बहिणीकडे ठेवले, रुग्णालयात विनंती करुन रात्रपाळी मागून घेतली आणि दिवसा तिघांचे जेवण पोहोचवणे, औषधे पोचती करणे ही धावपळ सांभाळली. सुदैैवाने सर्व जण कोरोनामधून पूर्णपणे बरे झाले. ‘मी त्यावेळी हात-पाय गाळून बसले असते, तर घरच्यांचे कोणी केले असते? कोरोना काळात अनेकांनी आपली जवळची माणसे गमावली, त्यांच्या मानाने मला कमी त्रास झाला, यातच मी आनंद मानला’, असे प्रीती यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
गिटारवादक अमोल पिंगळे म्हणाला, “शहरात विविध ठिकाणी होणा-या सांगितिक कार्यक्रमांमध्ये, समारंभांमध्ये मी गिटार वाजवतो. पुण्यात तारांकित हॉटेल्समध्ये अनेक कार्यक्रम होतात. गिटार वादनाचे तासाप्रमाणे पैैसे मिळतात आणि एक वेळचे जेवणही होते. वडील सफाई कामगार आहेत. कोरोनामुळे कार्यक्रम बंद पडल्याने इन्कम थांबली. वडील सफाई कामगार असल्याने त्यांना कोरोनाचा धोका पत्करुन काम करावे लागत होते. जुलैैमध्ये त्यांना कोरोना झाल्यावर त्यांना रुग्णालयात भरती केले आणि चारच दिवसांत त्यांचे निधन झाले. घरी आजी, आई आणि तीन बहिणी आहेत. संपूर्ण जबाबदारी पेलण्याशिवाय माझ्यासमोर पर्याय नव्हता. आई पापड, कुरडई, लोणची करते. मी भाजी विकायला सुरुवात केली आणि आईने केलेले पदार्थांच्या आॅर्डर घेऊन घरपोच पोहोचवायला सुरुवात केली. वडिलांच्या आशीर्वादाने आणि कलेतून मिळालेल्या सकारात्मकतेमुळे मी संकटातून मार्ग काढू शकलो.”