तमाशा, खडीगंमत, लावणीचा ठेवा खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:13 AM2021-01-19T04:13:37+5:302021-01-19T04:13:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या साठ वर्षांत सादर झालेल्या शास्त्रीय गायन, वादन, नृत्य, तमाशा, लावणी, दशावतार, खडीगंमत, पोवाडे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या साठ वर्षांत सादर झालेल्या शास्त्रीय गायन, वादन, नृत्य, तमाशा, लावणी, दशावतार, खडीगंमत, पोवाडे आदी लोककला प्रकार तसेच नाटके, परिसंवाद, मुलाखती, पुरस्काराचे कार्यक्रम, छायाचित्रे, दुर्मिळ ध्वनीमुद्रण, चित्रफिती, पुस्तके, मासिके, लेख, इतर साहित्य असा दुर्मिळ सांस्कृतिक ठेवा राज्य सांस्कृतिक संचालनालयाकडे जतन केलेला आहे. लवकरच हा ठेवा सर्वांसाठी खुला करण्यात येणार आहे.
अनेक कार्यक्रमातील छायाचित्रे व चित्रफितीच्या स्वरूपातील सांस्कृतिक ठेवा मुंबईच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये आहे. यात लोप पावत चाललेल्या लोककलांच्या चित्रफिती आहेत. वीस हजारांपेक्षा जास्त पुस्तके, जुन्या दुर्मिळ संगीत नाटकांच्या संहिताचा संग्रह आहे. आजवर हा ठेवा सर्वसामान्यांना खुला नव्हता.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे युट्यूब आणि फेसबुक पेजवरून या सांस्कृतिक ठेव्यातील महत्त्वाच्या बाबी प्रसारित करण्यात येणार आहेत. पु. ल. देशपांडे कला अकादमीमध्ये या चित्रफिती व ध्वनिफिती यांचा आस्वाद घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण केला जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.