माहितीपटातून जपला कर्तृत्वाचा ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:35 AM2018-03-15T01:35:44+5:302018-03-15T01:35:44+5:30

भारतामध्ये अजूनही कर्तृत्ववान व्यक्तींचे जीवन माहितीपटाच्या रूपाने बंदिस्त करण्याची परंपरा निर्माण झालेली नाही. समाजात बहुअंगी काम करून खूप काही देऊन जाणाऱ्या व्यक्तींचा चालताबोलता इतिहास दृश्य स्वरूपात जतन करून ठेवण्यासाठी माहितीपट हे खूपच प्रभावी माध्यम आहे.

Keep your duties right from the documentary | माहितीपटातून जपला कर्तृत्वाचा ठेवा

माहितीपटातून जपला कर्तृत्वाचा ठेवा

Next


भारतामध्ये अजूनही कर्तृत्ववान व्यक्तींचे जीवन माहितीपटाच्या रूपाने बंदिस्त करण्याची परंपरा निर्माण झालेली नाही. समाजात बहुअंगी काम करून खूप काही देऊन जाणाऱ्या व्यक्तींचा चालताबोलता इतिहास दृश्य स्वरूपात जतन करून ठेवण्यासाठी माहितीपट हे खूपच प्रभावी माध्यम आहे. माहितीपट हे संशोधनावर आधारित असल्याने ते अत्यंत खात्रीशीर व महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा बनतात, असे गरवारे महाविद्यालयाचे प्रा. प्रदीपकुमार माने यांनी सांगितले. त्यांनी बनविलेला ‘अनिल अवचट-एक मुक्तछंद’ या माहितीपटावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होतो आहे.
प्रदीपकुमार माने म्हणाले, ‘‘मला यू-ट्यूबवर पाश्चात्त्य देशांमध्ये बनवलेले विविध विषयांवरील माहितीपट पाहण्याची आवड होती. लेखक अनिल अवचट यांचे ‘माणसं’ हे पुस्तक वाचताना मला त्यांच्यावर माहितीपट बनविला पाहिजे, असे खूप आतून वाटले. त्यांच्या ‘माणसं’ या पुस्तकानं चांगलाच भारावून गेलो. वाचक जेव्हा वाचक न राहता लेखकाचा अनुभव बनून जातो तेव्हाच खरं साहित्यदर्शन होत असतं असं म्हणतात. ‘माणसं’ पुस्तक वाचल्यानंतर माझंही असंच झालं. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या शिक्षकाच्या मुलाचे डोळे त्यामुळे खाडकन् उघडले. समाजाकडे पाहण्याची एक दिव्य दृष्टी मिळाली. त्या पुस्तकांची परंपरा पुढे ‘धागे उभे आडवे,’ ‘धार्मिक,’ ‘प्रश्न आणि प्रश्न,’ ‘कोंडमारा’ यांसारख्या पुस्तकांनी सुरू ठेवली. अनिल अवचट यांनी रिपोर्टताजसाठी केलेला विविध प्रश्नांचा अभ्यासही स्तिमित करून गेला.
अवचटांचे वैशिष्ट्य असं आहे, की ते फक्त सामाजिक प्रश्न दाखवूनच थांबत नाहीत, तर त्या प्रश्नांसाठी झटणाºया ‘कार्यरत’ आणि ‘कार्यमग्न’ व्यक्तींचाही परिचय आपल्याला करून देतात. त्यांनी सामाजिक लेखन तर केलंच, पण कविता, ललितलेखनही केलं. बालसाहित्यात त्यांनी आगळे-वेगळे प्रयोगही केले. एकेकाळी धारदार सामाजिक प्रश्नांवर लिहिणारे अवचट आता आपणासमोर लहान मुलांसाठी ‘सरल-तरल’ लिहिणारे आजोबा म्हणून दिसतात. अवचटांच्या लेखनात जी विविधता दिसते आहे, त्यापेक्षा जास्त ते ज्या कलांमध्ये रमतात त्यात आहे. ओरिगामी, काष्ठशिल्प, बासरीवादन, गायन, चित्रकला, फोटोग्राफी, स्वयंपाक असे कितीतरी छंद त्यांना आहेत. लेखन, कला या क्षेत्रांबरोबरच मुक्तांगणसारख्या संस्थेद्वारे व्यसनमुक्ती क्षेत्रात दिलेले त्यांचे योगदान संपूर्ण महाराष्टÑाला विसरता येणार नाही. अशा या मुक्तछंद पण तरीही संवेदनशील माणसाचा जीवनप्रवास ४५ मिनिटांच्या माहितीपटात मांडणं ही आमच्यासाठी आव्हानात्मक गोष्ट होती.
माहितीपटाच्या पहिल्या टप्प्यात आम्ही अवचटांच्या जवळ-जवळ दहा तासांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर त्यांच्या जीवनावर भाष्य करणाºया विविध व्यक्तींच्या साधारणत: एकेक तासाच्या मुलाखती घेतल्या आणि मग हमाल, वेश्या, भंगी, मासेमार, जुना बाजार, मंडई, हेल्पर्स आॅफ द हॅन्डीकॅप्ड संस्था अशा कितीतरी ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष चित्रण केले. हेही चित्रण दहा-बारा तासांचे झाले. म्हणजे तीसपेक्षा जास्त तासांच्या फुटेजच्या आधारे हा माहितीपट बनविला आहे. इतक्या फुटेजमधून अवचटांचे जीवन ४५ मिनिटांत मांडणं हे आमच्यापुढं आव्हान होतं, पण त्यातच तर खरी सृजनशीलता असते. हे सगळं करत असताना आम्हाला खूप वेगवेगळे अनुभव आले, खूप काही शिकायला मिळाले. त्यांच्या सहवासातला अनुभव हा अनुभव खूपच समृद्ध करणारा आहे.
‘माणसाचं शिकणं संपलं, की त्याने स्वत:चा फोटो घरात लावून त्याला दररोज हार घालावा. शिकणं संपलं म्हणजे माणूस जिवंत असून मेल्यासारखाच ना’ अनिल अवचटांवरील माहितीपटाचे शूटिंग करताना ते एकदा असंच नकळतपणे बोलून गेले.
समोर येणाºया प्रत्येक क्षणाला भरभरून प्रतिसाद देत जगणं म्हणजे काय असतं, याचं अनिल अवचट उत्तम उदाहरण आहेत. स्वत: मुक्तपणे जगण्याचा आनंद घेत असतानाही त्या आनंदातून स्वत:बरोबर आसपासच्या जगातही बदल करीत राहणं इतकी सोपी गोष्ट नाही. त्यांची समाज, निसर्गाविषयी संवेदनशीलता सतत जाणवत राहते. यापुढील काळातही सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय आदी वेगवेगळ््या क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटविणाºया व्यक्तींच्या कार्यावर माहितीपट बनविण्याचा विचार आहे.

Web Title: Keep your duties right from the documentary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.