सोक्षमोक्ष लावायचाच हे डोक्यात ठेवून तो राजगडावर; लग्नास नकार देताच ब्लेड कटरने दर्शनाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 10:40 AM2023-06-27T10:40:12+5:302023-06-27T10:41:06+5:30
दर्शना आणि राहुल हे लहानपणापासून एकमेकांच्या परिचित असून राहुल तिच्यावर प्रेम करत असल्याचे त्याने पोलीस चौकशीत सांगितले
पुणे : दर्शना पवार आणि राहुल हंडोरे यांची चांगली मैत्री होती. लग्नाबाबत विचारल्यावर ती टाळाटाळ करत असे. त्यात ती एमपीएससी उत्तीर्ण झाल्याने आता आपल्याला टाळते, असा त्याचा समज झाला होता. काय तो सोक्षमोक्ष लावायचाच हे डोक्यात ठेवून तो तिला घेऊन राजगडावर गेला होता. बरोबर ब्लेड कटरही खिशात ठेवले होते. त्याने तिला निर्वाणीचे विचारले. त्यावर तिने घरच्यांचा नकार आहे, असे सांगितले आणि त्यांच्यात वादावादी, झटापट झाली. तेव्हा त्याने खिशातून ब्लेड कटर काढून वार केले अन् दगडाने मारून हत्या केली. त्यानंतर काहीही न झाल्याचे दर्शवत तो दुचाकी घेऊन तेथून निघून गेला. दर्शना पवार हिची हत्या करणाऱ्या राहुल हंडोरे याने पोलिसांना दिलेल्या जबाबात ही हकीकत सांगितली.
काही दिवसांतच वन अधिकारी होणाऱ्या दर्शना पवार हिची हत्या करणाऱ्या राहुल हंडोरे याला ग्रामीण पोलिसांनी अंधेरी येथून बुधवारी रात्री अटक केली होती. अधिक तपासासाठी न्यायालयाने त्याला २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. विभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
सुरुवातीला दोन दिवस राहुल हा काहीही सांगायला तयार नव्हता. त्यानंतर त्याने एक एक बाबी सांगण्यास सुरुवात केली. दर्शना आणि राहुल हे लहानपणापासून एकमेकांच्या परिचित होते. बारावीनंतर त्यांच्यात मैत्री झाली. एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी ते पुण्यात आल्यावर त्यांचा परिचय वाढला. राहुल तिच्यावर प्रेम करत होता; पण दर्शना त्याला तितका प्रतिसाद देत नव्हती. एमपीएससी पास झाल्यानंतर तिच्या घरांनी तिच्या लग्नाचा विषय सुरू केला होता. त्यामुळे राहुल अस्वस्थ होता. त्यामुळे तो तिला राजगडला घेऊन गेला. मैत्री असल्याने तीही त्याच्याबरोबर गेली.
तिकडे गेल्यावर राहुलने लग्नाचा विषय काढला. तेव्हा तिने घरच्यांचा नकार असल्याचे सांगितले. त्यांच्यात वादावादी झाली. त्यातून तिची हत्या केली. या घटनेनंतर तो सांगलीला पळून गेला. तेथून मडगाव, गोवा, चंडीगड, लखनौ, प्रयागराज तेथून पुन्हा लखनौला आला. त्यानंतर तो हावडा येथे गेला. तेथून मुंबईला आला होता. यादरम्यान त्याने स्वत:चा फोन बंद ठेवला होता. इतर प्रवाशांचा मोबाइल घेऊन तो नातेवाइकांशी बोलत होता. त्यामुळे पोलिसांना त्याचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या.
या प्रवासादरम्यान कर्नाटकात रेल्वे स्थानकावर थांबली असताना तेथील एटीएममधून पैसे काढले होते, तसेच हावडा आणि मुंबईत आल्यावरही पैसे काढले. मुंबईत पैसे काढल्याने त्याचे पोलिसांना लोकेशन समजले.