‘छत्रपतीं’चा आदर्श ठेवून सामान्यांच्या हिताची जपणूक केली पाहिजे; शरद पवारांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 09:02 PM2023-06-08T21:02:59+5:302023-06-08T21:03:07+5:30
राज्यात कोल्हापूरसह अन्य काही दोन, तीन ठिकाणी जे घडले हे महाराष्ट्राला लौकीकाला शोभणारे नाही, सर्वांनी काळजी घ्या
बारामती : राज्यात घडलेल्या प्रकारानंतर शासकीय यंत्रणा किंवा पोलिस यंत्रणा जी काही पावले टाकत आहेत, त्या यंत्रणेला सर्वसामान्यांनी मनापासून सहकार्य करण्याची गरज आहे. आपण सगळ्यांनी यंत्रणेला सहकार्य केले तर हे प्रकार तातडीने बंद झाल्याचे आपल्याला दिसून येईल. कोल्हापूर शहर असो की अन्य शहरे असो. या सगळ्या शहरांचा सामाजिक परिवर्तनाची ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे. तेथे शांतताच निर्माण केली पाहिजे. छत्रपती शाहू महाराज, महाराणी ताराराणी यांचा आदर्श ठेवून सामान्य माणसाच्या हिताची जपणूक केली पाहिजे, असे मत ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले.
बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.पवार पुढे म्हणाले, राज्यात कोल्हापूरसह अन्य काही दोन, तीन ठिकाणी जे घडले हे महाराष्ट्राला लौकीकाला शोभणारे नाही. महाराष्ट्र हे संयमी, शांतताप्रिय राज्य आहे. येथील सर्वसामान्य लोकांची कायदा हातात घेण्याच्या संबंधीची प्रवृत्ती नाही. चार-दोन लोक कोणी तरी चुकीचे वागत असतील पण बहुसंख्य समाजाने संयमाची भूमिका घेतल्यानंतर राज्य शासनाने त्यामध्ये सामंजस्याची भूमिका घेतल्यानंतर ही स्थिती बदलेल. शांतता प्रस्थापित होईल. कोणी तरी काही तरी प्रश्नातून जाणिवपूर्वक वादविवाद वाढवायचा प्रयत्न करत असेल त्यांनाही माझे आवाहन आहे की याची किंमच सामान्य माणसाला भोगावी लागते. सामान्य माणसाच्या हितासाठी असे प्रकार न घडतील याची काळजी घेण्याचे आवाहन पवार यांनी केले.
...नितीशकुमार यांचा फोन
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार त्यांच्या राज्यामध्ये देशातील विरोधी पक्षांच्या प्रमुखांची बैठक घेणार आहेत.त्यासाठी त्यांनी मला फोन करुन निमंत्रित केले असुन तेथे मी जाणार आहे. यानिमित्ताने देशापुढील प्रश्नावर एकत्र येवून भूमिका घेण्याची आवश्यकता दिसते. ती घ्यायची असेल तर विविध राजकीय पक्षांना एकत्र यावच लागेल. सरकारच्या सोबत सामुहिक भूमिका मांडावीच लागेल. त्यासाठी हा प्रयत्न आहे. त्याला माझा व सहकारी मित्रांचा पूर्ण पाठींबा असल्याचे पवार म्हणाले.