नव्वदीच्या उंबरठ्यावरही केली कोरोनावर मात; शरणव्वा आजींची धैर्यकथा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 05:55 AM2021-04-30T05:55:35+5:302021-04-30T06:00:07+5:30
पक्षाघात, रक्तदाबालाही ठेवले आहे धाकात
पुणे : रास्ता पेठेतल्या शरणव्वा आजींनी नव्वदीच्या उंबरठ्यावर असताना कोरोनाचा हल्ला परतवून लावला. अवघ्या ६ दिवसांत कोरोना पॉझिटिव्हवरून निगेटिव्ह झालेल्या शरणव्वा दोडमणी आजींनी गेली अनेक वर्षे पक्षाघात आणि रक्तदाब या दोन आजारांनाही आपल्या धाकात ठेवले आहे.
बरोबर होळी पौर्णिमेच्या दिवशी आजींची टेस्ट पॉझिटिव्ह आली. मुलगा, सून, दोन्ही नातू निगेटिव्ह होते. डॉ. सुहास कलशेट्टी यांनी सीटी स्कॅनचा स्कोर पाहिला, तो होता १२. आजींना त्यांनी लगेच दाखल करून घेतले व उपचार सुरू केले. तेव्हा आजींची ऑक्सिजन पातळी कमी-जास्त होत होती.
रुग्णालयात दाखल होताच आजींनी उपचारांना प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. वेळेवर गोळ्या, औषधे, साधेच पण वेळेवर खाणे व डॉक्टरांचे प्रत्येक म्हणणे ऐकणे. तिसऱ्याच दिवसांपासून ऑक्सिजन पातळी सुधारली. स्कोर कमी व्हायला सुरुवात झालीच होती. सहाव्या दिवशी आजी व्यवस्थित होत्या. टेस्ट केली ती निगेटिव्ह आली. त्यांना लगेच डिस्चार्जही मिळाला.
साधा आहार
आजींचे नातू अनिकेत दोडमणी सांगतात, आजी फार धीराची आहे. ती कशालाच घाबरत नाही. साधी भाजी-भाकरी हाच तिचा आहार आहे. तिला रक्तदाब आहे. त्याच्या गोळ्याही वेळेवर घेऊन तिने तो नियंत्रणात ठेवला आहे. दोन वर्षांपूर्वी पक्षाघाताने तिच्या शरीराची उजवी बाजू लुळी पडली. पण तिने त्यावरही धीराने मात केली व आता ती बाजू काही प्रमाणात कार्यरत झाली आहे. कोरोनावर ती मात करेल अशी आमची सर्वांचीच खात्री होती.