रॉकेलचे दिवे असलेली सायकल...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 06:57 AM2018-05-21T06:57:09+5:302018-05-21T06:57:09+5:30
विविध प्रकारांचा समावेश : चिमुकल्यांनी अनुभवले सायकलींचे समृद्ध भांडार
पुणे : पहिल्या महायुद्धात वापरलेली बुलेट म्हणजेच बंदुकीची सायकल, दुर्मिळ फोल्डिंग सायकल, १९१५ ची सनबीम सायकल, हॉफमन, रॉयल एनफिल्ड सायकल, रॉकेलचे दिवे असलेली सायकल अशा स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या विविध देशातील विविध प्रकारच्या सायकली पाहण्याची संधी चिमुकल्यांना मिळाली. सायकलींचा समृद्ध वारसा जतन करणारे विक्रम पेंडसे यांचा सायकल संग्रह चिमुकल्यांना अनुभवता आला.
बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे जागतिक संग्रहालय दिनानिमित्त विद्यार्थ्यांना सायकल संग्रहालय दाखवण्यात आले. कर्वेनगर येथील सहवास सोसायटीमध्ये सफरीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी इतिहास संशोधक प्र. के. घाणेकर, शिल्पकार विवेक खटावकर, विक्रम पेंडसे, मंडळाचे अध्यक्ष पीयूष शहा, नरेंद्र व्यास, अनिल दिवाणजी, पांडुरंग गायकवाड, कुमार रेणुसे, अप्पा वणकर, अभिषेक मारणे, सागर घम, भावेश ठक्कर, नितीन पंडित, अशोक जाधव, प्रीती वाहिले, कल्याणी जावळकर, हेमलता शाह, सारिका पाटणकर उपस्थित होते. यावेळी विक्रम पेंडसे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
२०० सायकलींचे प्रकार
विक्रम पेंडसे म्हणाले, ‘सायकलींचा संग्रह करण्याच्या आधी मोटारसायकली जमवण्याचा छंद होता. परंतु, पुणे शहराची ओळख असलेल्या सायकलीकडे दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात आल्यावर आपोआप सायकलींचा संग्रह करण्याची आवड निर्माण झाली. या मधूनच २०० विविध प्रकारच्या सायकली असणारे हे संग्रहालय उभे राहिले आहे. पूर्वी वाडे होते तोपर्यंत सायकली होत्या; परंतु वाड्यांची संख्या जशी कमी झाली, तशा सायकलीदेखील कमी झाल्या.’
ंस्वातंत्र्यापूर्वीच्या सायकली
सायकलचे जुने डायनामो, दुरुस्ती कीट, पूर्वी सायकलींना कर भरावा लागत असे, ते दुचाकी कर बिल्ले, कार्बाइडचे दिवे यासोबतच सायकलीचे विविध भागदेखील संग्रहालयात विद्यार्थ्यांनी पाहिले. भारतात स्वातंत्र्याच्या आधीपासून बाहेरील देशातून सायकली आणल्या जात, त्यातील अनेक सायकली अतिशय चांगल्या स्वरूपात विद्यार्थ्यांना पाहायला मिळाल्या.