जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

By admin | Published: November 11, 2016 01:49 AM2016-11-11T01:49:41+5:302016-11-11T01:49:41+5:30

केंद्र शासनाच्या पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटाबंदीमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी जीवनाश्यक वस्तूसाठी अडवणूक

Kerrachi basket on orders of collector | जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

Next

पिंपरी : केंद्र शासनाच्या पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटाबंदीमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी जीवनाश्यक वस्तूसाठी अडवणूक करणारांवर कारवाईचा इशारा दिला होता. मात्र, जीवनावश्यक औषधे, भाजीपाला व पेट्रोल खरेदी करतानाही सुट्या पैशाअभावी नागरिकांची गुरुवारी अडवणूक झाली. रुग्णालयात नवीन नोटासाठी रुग्णांच्या नातेवाइकांचे हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाशी वाद झाले. सकाळपासून दिवसभर उन्हा-तान्हात उभे राहूनही बँकेतून पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिक, चाकारमाने व नोकरदारांची जीवनावश्यक वस्तुखरेदीसाठीची परवड झाली. सुट्या पैशांअभावी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला दुकानदारांनी केराची टोपली दाखविल्याचे ‘लोकमत’ टीमने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये दिसून आले.


औषधे नाकारल्याने रुग्णांची गैरसोय
पिंपरी : जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतरही शहरातील औषध दुकानदार पाचशे व हजारच्या नोटा घेत नसल्याचा अनुभव आला. लोकमत प्रतिनिधींनी जीवनाश्यक बाब म्हणून पिंपरी-चिंचवड येथील काही औषध दुकानांमध्ये डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननुसार औषध खरेदी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, औषध दुकानदारांनी सुट्या पैशाअभावी स्पष्ट नकार दिला.
पिंपरी चौकातील एका औषध दुकानामध्ये सुमो कोल्ड टॅब्लेट्स व ब्रो - झेडेक्स कफ सिरप या औषधांचे बिल देण्यासाठी पाचशे रुपयांची नोट दिली. तेव्हा दुकानदाराने आमच्याकडे सुटे पैसे नाहीत. वाटल्यास निम्मीच औषधे घेऊन जा व त्याचे सुटे पैसे द्या, असे सूचविले.
रुग्णांना या गोळ्या गरजेच्या आहेत, बँकांमध्येही गर्दी आहे. त्यामुळे सुटे पैसे काढू शकत नाही. तरी कृपया सर्व गोळ््या द्या! अशी
विनंती केली. त्यावर दुकानदाराने रागाच्या स्वरात मग बँकेत जाऊनच सुटे पैसे आणा ना उगाच आम्हाला का त्रास देता, असे सुनावले. तसेच, गोळ्या पुन्हा दुकानातच ठेवून
घेतल्या. असाच अनुभव इतर दुकानांतही आला.
कोणत्या रुग्णांसाठी औषधे ही अत्यावश्यक बाब आहे. परंतु, सुटे पैसे असतील तरच औषधे देऊ शकतो. आमच्याकडेही सुटे पैसे नाहीत, अस अनुभव रुग्णांच्या नातेवाईकांना येत आहे. त्यामुळे औषधांसाठी व सुटया पैशासाठी वणवण करावी लागत आहे. सरकारी निर्णयानुसार औषध दुकानांमध्ये पाचशे व हजारच्या
नोटा स्वीकारल्या पाहिजेत, हे खरे आहे. परंतु, आमच्याकडे परत देण्यासाठी सुटे पैसे नाहीत, अशी हतबलता व्यक्त केली.
पाचशेचे पेट्रोल
भरण्याची सक्ती
पिंपरी : लोकमत प्रतिनिधीने निगडीतील एका पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी गेले. त्यावेळी कर्मचाऱ्याला १३० रुपयांचे पेट्रोल भरण्यास सांगितले. मात्र, पाचशे रुपयांची नोट पाहताच कर्मचाऱ्याने पेट्रोल भरण्यास नकार दिला. जर पूर्ण पाचशे किंवा हजार रुपयांचे पेट्रोल भरणार असाल तरच या नोटा स्वीकारण्यात येतील, असे त्या कर्मचाऱ्याने सांगितले. वाहतूक नगरीमधील पंपावरही कर्मचाऱ्याला पाचशे रुपयांची नोट घेणार का, असे विचारले असता, पूर्ण पैशांचे पेट्रोल भरणार असाल तरच ती नोट घेऊ, असे स्पष्ट सांगितले. पेट्रोल व डिझेल अत्यावश्यक गरजांपैकी एक असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पंपावर पाचशे व हजारांच्या नोटा घेणे अपेक्षित होते. मात्र, नोट घ्यायची, पण तिचा पूर्ण खर्च करण्याची सक्ती करायची, अशी शक्कल सर्वच पंपचालकांनी वापरून सोईनुसार या आदेशाला केराची टोपली दाखवली.


पोस्टात पैसे जमा करा, अन् नंतर काढून घ्या
पिंपरी : नवीन चलनी नोटा पोस्टात उपलब्ध नसल्याने पोस्टाकडून ग्राहकांकडच्या जुन्या नोटा गुरुवारी जमा करण्यात आल्या. मात्र, नवीन नोटा मिळणार नसल्यामुळे, सकाळपासून नोटा बदलण्यासाठी रांगेत उभे असलेल्या ग्राहकांचा हिरमोड झाला.
पाचशे आणि हजारांच्या नोटा जमा करून नवीन नोटा घेण्यासाठी चिंचवड येथील पोस्टात नागरिकांनी सकाळी दहापासूनच रांगा लावल्या होत्या. नागरिकांनी पैसे काढण्यासाठी एकच गर्दी केली. मात्र, पोस्टातील कर्मचाऱ्यांनी नवीन नोटा उपलब्ध झालेल्या नाहीत,असा फलक काउंटरवर लावल्याने, रांगेत उभ्या असलेल्यांनी नाराजी व्यक्त केली.
कोणालाही जुन्या नोटा बदलून मिळणार नाहीत. मात्र, जे पोस्टाचे खातेदार आहेत. त्यांनी फक्त आज त्यांच्याकडील हजार-पाचशेच्या जुन्या नोटा जमा कराव्यात. पैैसे उपलब्ध झाल्यानंतर त्यांना
त्यांच्या खात्यातून पैैसे काढता येणार असल्याचे सांगण्यात आले.

सुटे पैसे असतील, तर भाजी घ्या!
पिंपरी : येरवी भाजी घ्या, भाजी ! असे म्हणणारे भाजी विक्रते अगतिक झाल्याचे मंडईत दिसून आले. सुटे पैसे असतील, तरच भाजी घ्या, नाहीतर घेऊ नका, असे थेट भाजी दुकानदार ग्राहकांना सांगत होते. सध्या बाजारात पन्नास, शंभरच्या नोटांची कमतरता भासत आहे. दरम्यान, याचा जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली पिंपरीतील भाजी मंडई गुरुवारी ओस पडल्याचे दिसून आले.
काही जण भाजी खरेदीसाठी आले, मात्र पैसे सुटे भेटत नसल्याने भाजी खरेदीविनाच त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. त्यामुळे अनेकांना भाजी खरेदी करणे शक्यच झाले नाही. याचा फटका मंडईतील व्यापा-यानांही बसला. बहुतेक व्यापा-यांचा विक्रीसाठी आणलेला माल तसाच पडून आहे. तर नोटांची अडचण निर्माण होणार असल्याने त्याचा मालविक्रीवरही परिणाम होणार असल्याचे गृहीत धरुन काही व्यापार-यांनी गुरुवारी माल घेतानाच कमी घेतला.


नियोजनाअभावी बँकांमध्ये गोंधळ
१पिंपरी : नोटाबंदीमुळे झालेल्या तारांबळीतून सावरण्यासाठी आज सकाळपासूनच बँकांसमोर शेकडो लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, काही बँकांचे योग्य नियोजन नसल्याने नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. रावेत परिसरातील एका राष्ट्रीयकृत बँकेत परिसरातील नागरिकांनी सात वाजल्यापासूनच पैसे जमा करण्यासाठी गर्दी केली होती.
२दोन-अडीच तासांनंतर बँक व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले की, या शाखेत ज्यांची खाती आहेत, त्यांनीच इथे थांबावे. इतरांनी आपापल्या शाखेत जावे किंवा पिंपरीमधील शाखेत जाऊन पैसे भरावेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. इतर शाखांतील खातेदारांचे या शाखेतून नेहमी व्यवहार केले जातात, म्हणून खातेदारांनी आजही इथे गर्दी केली होती. मात्र आज बँक प्रशासनाकडून पूर्वकल्पना न दिली गेल्याने नागरिकांना वेळेचा अपव्यय व नाहक त्रासाला सामोेरे जावे लागले.
३निगडीमध्येही नागरिकांमध्ये संभ्रमावस्था दिसून आली. बँकेच्या बाहेर लागलेली रांग पैसे जमा करण्याची आहे की नोटा बदली करण्याची आहे, याबद्दल अनेकांचा गोंधळ उडाला. बेसुमार गर्दी असल्याने बँक कार्यालयात जाऊन थेट विचारताही येत नव्हते. माहितीपत्रक वाटणाऱ्या एका बँक कर्मचाऱ्याकडे विचारणा केली असता, मलाही सांगता येणार. दुपारी दोन-तीन वाजता तुमचा नंबर आल्यानंतर तुम्हीच आतमध्ये विचारा, असे उत्तर मिळत होते. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

Web Title: Kerrachi basket on orders of collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.