कळमोडी पाणी योजना मार्गी लागणार
By admin | Published: April 27, 2017 04:45 AM2017-04-27T04:45:55+5:302017-04-27T04:45:55+5:30
कळमोडी मध्यम धरण प्रकल्पाचे पाणी खेड, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांसह थिटेवाडीपर्यंत
शिक्रापूर : कळमोडी मध्यम धरण प्रकल्पाचे पाणी खेड, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांसह थिटेवाडीपर्यंत पोहोचविण्याच्या महत्त्वाकांक्षी सिंचन योजनेचा सुधारित प्रस्ताव पुढील दोन महिन्यांत सादर करण्याचे आदेश जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी झालेल्या विशेष बैठकीत दिले.
शिरूर, खेड व आंबेगाव तालुक्यांसाठी सन २०१४ मध्ये कळमोडी मध्यम धरण प्रकल्पातून निम्न उपसा जलसिंचन व निम्न प्रवाही सिंचन योजना प्रस्तावित करून ती मंजूरही करण्यात आली होती. पूर्वीच्या योजनेत खेड तालुक्यातील कडधे, कहाणेवाडी बुद्रुक, मोहकल, कमान, चास, पापळवाडी, मिरजेवाडी ही गावे समाविष्ट होती, तर आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी, कोल्हारवाडी, थुगाव, माळवाडी, भावडी, कारेगाव, पेठ, पारगाव आदी सातगाव पठारांवरील गावांचा समावेश होता. पुढील काळात या योजनेत खेड तालुक्यातील वरुडे, पुर, कनेरसर व वाफगाव या गावांचा वाढीव समावेश करण्याची मागणी आमदार सुरेश गोरे यांनी करून योजना तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी केली होती. याशिवाय शिरूर तालुक्यातील पाबळ परिसरासह थिटेवाडी बंधाराही या योजनेत समाविष्ट करून घेऊन त्यात पाणी आणण्याची मागणी जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा जयश्री पलांडे व पाणी हक्क परिषदेचे अध्यक्ष परमेश्वर चौधरी यांनी केली होती. याबाबत चौधरी यांनी मागील वर्षी उपोषणही केले होते. याच पार्श्वभूमीवर याप्रश्नी जलसंपदामंत्री गिरीश महाजन मंत्रालयात बैठक बोलाविली होती.
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक एस. व्ही. धोटे, मुख्य अभियंता ता. ना. मुंडे, अधीक्षक अभियंता एच. टी. धुमाळ, कार्यकारी अभियंता सुनील प्रदक्षणे, व्ही. एन. लोंढे आदी प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत संपूर्ण योजनेची माहिती घेऊन महाजन यांनी या योजनेचा सुधारित प्रस्ताव पुढील दोन महिन्यांत सादर करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, दोन महिन्यांनंतर होणाऱ्या बैठकीत या योजनेची प्रत्यक्ष कार्यवाही करण्यासाठी कामाची निविदा प्रक्रियाही त्याच बैठकीत करून पुढील सहा महिन्यांत प्रत्यक्ष काम सुरू होईल, अशी ग्वाहीही या वेळी महाजन यांनी दिली. बैठकीला खासदार शिवाजी आढळराव; आमदार सुरेश गोरे, जयसिंग एरंडे, जयश्री पलांडे, अरुण गिरे, रवींद्र करंजखिले, परमेश्वर चौधरी, अशोकराव पलांडे, समाधान डोके, सुनील बाणखेले, पंचायत समिती सदस्या शीतल तोडकर, अशोक बाजारे, भाऊसाहेब सावंत, सोपान जाधव, गोविंद साकोरे व शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)