गर्भवती-प्रसूत महिलांना पाणी टंचाईच्या कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:15 AM2021-02-18T04:15:49+5:302021-02-18T04:15:49+5:30

कमला नेहरू रुग्णालयातली दुरवस्था : स्वच्छतागृहांना कुलूप, अन्य वॉर्डातून होते हकालपट्टी लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : प्रसूतीसाठी दाखल झालेल्या ...

The keys to water scarcity in pregnant women | गर्भवती-प्रसूत महिलांना पाणी टंचाईच्या कळा

गर्भवती-प्रसूत महिलांना पाणी टंचाईच्या कळा

Next

कमला नेहरू रुग्णालयातली दुरवस्था : स्वच्छतागृहांना कुलूप, अन्य वॉर्डातून होते हकालपट्टी

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : प्रसूतीसाठी दाखल झालेल्या गरोदर महिलांना पालिकेच्या आरोग्य विभागाच्या असंवेदनशील कारभारामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील स्वच्छतागृहांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीच येत नसल्याने या महिलांची कुचंबणा होत आहे. दुसऱ्या वॉर्डातील स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी जावे, तर या महिलांना तेथील नर्स आणि डॉक्टर हाकलवून लावत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

या रुग्णालयातील व्यवस्था सुधारण्यासाठी अनेकदा लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी मागणी केली आहे. परंतु, आरोग्य विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. गेल्या आठवड्याभरापासून कमला नेहरू रुग्णालयातील रुग्णांना पाणीच मिळत नसल्याचे समोर आले आहे. वारंवार तक्रारी करूनही रुग्णालय प्रशासन याची साधी दखलही घेत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक हतबल झाले आहेत.

याठिकाणी प्रसुतीकरिता दाखल झालेल्या एका महिलेच्या बहिणीने याबाबत ‘लोकमत’कडे कैफियत मांडली. या महिलेची बहीण प्रसूतीसाठी दाखल झाल्यानंतर तिचे सिझेरियन झाले. दोन-तीन दिवसांची ही ओली बाळंतिण स्वच्छतागृहात गेली असता, तेथे पाणी नव्हते. त्यामुळे ती १० नंबर वॉर्डमध्ये गेली. परंतु, तेथे कुलूप लावण्यात आलेले होते. दुसऱ्या एका वॉर्डमध्ये गेल्यावर तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी या महिलेला तेथून हाकलून लावले. ‘तुमच्या वॉर्डात स्वच्छतागृह आहे, त्याचाच वापर करा. अन्य वॉर्डात येऊ नका.’ असे म्हणत परत पाठवून दिले. या महिलेला चौथ्या मजल्यावरच्या स्वच्छतागृहापर्यंत चढून जावे लागले.

असाच अनुभव नुकत्याच दाखल झालेल्या आणखी एका गरोदर महिलेला आला. ही महिला अद्याप प्रसूत झालेली नसली, तरी तिचे दिवस भरलेले आहेत. त्यामुळे अधिक काळजी घ्यावी लागते. परंतु, या अवघडलेल्या अवस्थेतील महिलांना पालिकेच्या आरोग्य विभागाकडून असंवेदनशीलतेची वागणूक दिली जात आहे. महिला व अन्य रुग्णांना स्वच्छतागृहासह अंघोळीसाठी पाणी नसल्याने नातेवाईक आरडाओरडा करीत आहेत. परंतु, त्यांच्या उद्विगनतेकडेही दुर्लक्ष केले जात आहे. याठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे सुरू असल्याने पाणी पुरवठ्यात अडचणी आल्याचे सांगितले जाते. मात्र पर्यायी व्यवस्था कोण उपलब्ध करून देणार, यावर कोणीच बोलायला तयार नाही.

Web Title: The keys to water scarcity in pregnant women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.