खोडद गावात एक दिवा शहिदांसाठी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:05 AM2018-11-11T00:05:44+5:302018-11-11T00:06:08+5:30
तरुणांचा उपक्रम : अनेक वर्षांपासून होत आहे आयोजन
खोडद : देशासाठी हुतात्मा होणाऱ्या जवानांना कायम स्मरणात ठेवणे ही विरळाच गोष्ट; पण खोडद गावामध्ये काही वर्षांपासून एक आगळावेगळा उपक्रम सुरू आहे. हुतात्मा जवानांना दिवाळीत पणती प्रज्वलित करून आदरांजली वाहण्याची परंपरा येथील तरुणांनी जोपासली आहे.
दिवाळी म्हटले, की नवीन कपडेखरेदी, फटाक्यांची आतिषबाजी, दिवाळी फराळाचा घमघमाट, घरासमोर रांगोळ्या आणि त्यात प्रज्वलित केलेल्या पणत्या असे चित्र आपण आपल्या घरी आणि सगळीकडेच पाहतो. मात्र, जुन्नर तालुक्यातील खोडद गावातील युवक काही वर्षांपासून एक आगळीवेगळी दिवाळी साजरी करीत आहेत. देशाच्या सीमेवर हुतात्मा झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ लक्ष्मीपूजनच्या दिवशी पणत्या प्रज्वलित करून त्यांना आदरांजली वाहून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
खोडद (ता. जुन्नर) येथील मुक्ताई कला क्रीडा मंडळाने ‘एक दिवा शहिदांसाठी’ उपक्रम आयोजित केला होता. या वेळी खोडद गावातील ग्रामस्थ, महिला, युवा वर्ग आणि माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खोडद गावात दर वर्षी दिवाळीमध्ये हुतात्मा जवानांच्या स्मरणार्थ दीपोत्सव करून आदरांजली अर्पण केली जाते. खोडद येथील चावडी चौकात भारतमातेची प्रतिमा लावली होती. या वेळी ग्रामस्थ, युवक, महिला व माजी सैनिक तसेच सध्या सैन्यात रुजू असलेले सैनिक उपस्थित होते. माजी सैनिक चंद्रकांत पोखरकर यांनी आदरांजली वाहिली. गावातील अनेक मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी, अनेक मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामूहिक राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. रवींद्र थोरात यांनी प्रास्ताविक केले.
दिवाळी हा चैतन्याचा, आनंदाचा सण. अवघ्या देशात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येक जण कुवतीप्रमाणे हा सण साजरा करतो. पण, आपल्या आनंदातील एक क्षण दुसºयांच्या दु:खात सहभागी होऊन कृतार्थ होण्याचा खोडदच्या तरुणांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.
अनेक सामाजिक उपक्रमांत गाव अग्रेसर
४खोडदचे ग्रामस्थ आणि युवकांकडून आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. खोडद येथील चावडी चौकात भारतमातेची प्रतिमा लावण्यात आली होती. या वेळी ग्रामस्थ, युवक, महिला व माजी सैनिक तसेच सध्या सैन्यात रुजू असलेले सैनिक उपस्थित होते.
४माजी सैनिक चंद्रकांत पोखरकर यांनी सर्वांच्या वतीने आदरांजली वाहिली.
४या वेळी खोडद गावातील अनेक मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी, अनेक मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामूहिक राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.