खोरच्या ग्रामसभेत खडाजंगी

By admin | Published: August 17, 2016 01:02 AM2016-08-17T01:02:39+5:302016-08-17T01:02:39+5:30

येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मोठी खडाजंगी झाली. खोर हे गाव सांसद आदर्श योजनेंतर्गत खासदार वंदना चव्हाण यांनी दत्तक घेतले

Khadajangi in Khor Gram Sabha | खोरच्या ग्रामसभेत खडाजंगी

खोरच्या ग्रामसभेत खडाजंगी

Next

खोर : येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मोठी खडाजंगी झाली. खोर हे गाव सांसद आदर्श योजनेंतर्गत खासदार वंदना चव्हाण यांनी दत्तक घेतले असल्याने या पार्श्वभूमीवर आराखडा तयार करण्याच्या दृष्टिकोनातून तहसीलदार उत्तम दिघे हे ग्रामसभेस उपस्थित राहिले होते.
या वेळी ग्रामविकास अधिकारी अशोक लोणकर व सरपंच रामचंद्र चौधरी यांनी अहवाल वाचन करून ग्रामसभेंतर्गत येणारे प्रश्न व त्यावरील उपाययोजना याविषयी उपस्थित ग्रामस्थांना सांगितले. त्यानंतर उत्तम दिघे यांनी सांसद आदर्श योजनेच्या संदर्भात कोण-कोणत्या गोष्टींची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे या विषयीची माहिती दिली. अहवाल वाचन पूर्ण झाल्यानंतर ग्रामस्थ सुहास चौधरी यांनी भ्रष्टाचारमुक्त गाव व ग्रामपंचायत सदस्य व्हावे यासाठी ग्रामसभेत ठराव मंजूर करून घ्यावा व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या कामकाजाच्या वेळा देखील ठरविणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यानंतर कुल समर्थक विकास चौधरी यांनी ग्रामपंचायतीच्या चाललेल्या बोगस कारभारावरती हात घातल्याने एकच खळबळ उडाली. विकास चौधरी यांनी या वर्षी कोण-कोणती विकासाची कामे झाली, त्यानुसार त्या कामाला किती खर्च अपेक्षित होता व किती खर्च करण्यात आला याविषयी माहिती बिलासह देण्याची मागणी सरपंच रामचंद्र चौधरी व ग्रामविकास अधिकारी अंकुश लोणकर यांच्याकडे केली. ग्रामसेवकांना वेळोवेळी प्रस्ताव देऊन आजपर्यंत कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. शौचालयाच्या नोंदी केल्या जात नाहीत, तसेच ग्रामपंचायत कुठल्याही प्रकारची माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप चौधरी यांनी केला. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेदेखील ग्रामपंचायतीने दिली नसल्याचे विकास चौधरी म्हणाले. यानंतर लगेचच ग्रामसभेचे वातावरण तापले व तहसीलदार उत्तम दिघे यांच्यासमोरच कुल-थोरात गटात समर्थकांमध्ये खडाजंगीला सुरुवात झाली. आमने-सामने आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली. आताच जर असे हेवेदावे होत असतील तर सांसद आदर्श गावासाठी खोर गावाची निवडच करू नका, त्यानुसार ठरावदेखील ग्रामसभेत घ्या, असे थोरात समर्थक मोहन डोंबे म्हणाले. मागील पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत सरपंच पदावर असणाऱ्यांनी कोऱ्या चेकवर सह्या केल्या, मात्र आताचे चाललेले पंचवार्षिक योजनेचे कामकाज हे विरोधकांना पाहवत नसल्याचे डोंबे म्हणाले आहे. या सर्व प्रश्नाला उत्तर देत व सामंजस्याची भूमिका सरपंच रामचंद्र चौधरी यांनी घेतली व त्यांनी सांसद आदर्श योजनेसाठी खोर गावाची निवड केली आहे, ती केवळ माझ्या एकट्यासाठी केलेली नसून, गावाचा सहभाग असणे महत्त्वाचे आहे, असे सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Khadajangi in Khor Gram Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.