वैद्यकीय महाविद्यालयाच्या सल्लागारावरून महापौर-आयुक्तांमध्ये खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:20 AM2021-02-18T04:20:38+5:302021-02-18T04:20:38+5:30

पुणे : महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘सल्लागारा’वरून बुधवारी महापौर ...

Khadajangi in the mayor-commissioner from the advisor of the medical college | वैद्यकीय महाविद्यालयाच्या सल्लागारावरून महापौर-आयुक्तांमध्ये खडाजंगी

वैद्यकीय महाविद्यालयाच्या सल्लागारावरून महापौर-आयुक्तांमध्ये खडाजंगी

Next

पुणे : महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘सल्लागारा’वरून बुधवारी महापौर आणि पालिका आयुक्तांमध्ये बैठकीदरम्यान खडाजंगी झाली. सल्लागार बदलण्याची भूमिका प्रशासनाने घेतल्यामुळे महापौरांनी त्याला विरोध केला. या वेळी आयुक्तांनी थेट ‘अधिकारां’चा उल्लेख केला. त्यामुळे संतापलेल्या महापौरांनीही जोरदार प्रत्त्युत्तर दिले. या वादाची चर्चा दिवसभर महापालिका भवनामध्ये सुरु होती.

शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीला उपमहापौर, सभागृह नेत्यांसह आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये कोरोनासंबंधी विषयांचा आढावा घेतल्यानंतर आरोग्यविषयक मुद्यांवर चर्चा सुरु होती. ही चर्चा सुरु असताना वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय चर्चेला आला. या वेळी, या महाविद्यालयासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागाराला बदलणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. वैद्यकीय महाविद्यालयासाठीचे इन्फ्रास्ट्रक्चर, इमारती उभ्या करण्यासाठी हा सल्लागार नेमण्यात आलेला आहे.

या वेळी महापौरांनी प्रकल्प पुढे गेला असून अंतिम टप्प्यात आला आहे. आता सल्लागार बदलला तर पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल. यामुळे विलंब लागू शकतो. त्यामुळे आम्हाला अडचण होईल असे नमूद केले. ही चर्चा सुरु असतानाच वाद वाढल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. आयुक्त विक्रम कुमार यांनी बोलताना ‘सल्लागार बदलणे अथवा न बदलणे हा आमचा अधिकार आहे.’ असे नमूद केले. त्यामुळे चिडलेल्या महापौरांनीही ‘आमचीसुद्धा भूमिका आहे. आम्ही ती आग्रहाने मांडणार. आम्ही काही गोट्या खेळायला आलेलो नाही.’ अशी कठोर भूमिका घेतली. या वादात सभागृह नेते गणेश बिडकर यांनी मध्यस्थी करीत हा वाद शांत केला. त्यानंतर महापौर, आयुक्त यांच्यासह मोजक्या पदाधिकाऱ्यांमध्ये या विषयावर वेगळी बैठक झाल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Khadajangi in the mayor-commissioner from the advisor of the medical college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.