खडकवासल्यात झालंय बनावट मतदान..! तब्बल ७५ जणांनी केलंय फेक मतदान तर ५३ मत बाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 06:10 PM2024-11-25T18:10:25+5:302024-11-25T18:10:25+5:30
khadakwasala Vidhan Sabha Election Result 2024
धनकवडी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि महायुतीला भरघोस प्रतिसाद मिळाला, दरम्यान निकालानंतर बनावट मतदान, बाद मतदान, नोटा मतदान, टपाली मतदान, गृह मतदान, अनामत रक्कम जप्त अशा अनेक आकडेवारी समोर येत आहे, अनेक मतदार यावर्षी पहिल्यांदा मतदान करत होते; मात्र त्या मतदारांना मतदानासाठी गेल्यानंतर आपले नाव न सापडल्याच्या घटना समोर आल्या तर काहींना त्यांच्या नावावर बोगस मतदान झाल्याचे दिसून आले आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघात ७५ जणांनी बनावट (फेक) मतदान केलं तर ५३ मतदारांचे मतदान बाद करण्यात आले.
काय आहे बनावट (टेंडर व्होट) मतदान?
एखादा मतदार मतदान केंद्रावर जाण्यापूर्वीच त्याच्या नावाने दुसऱ्या कोणीतरी मतदान करून गेल्याचे आढळून येते. अशा वेळी संबंधित मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता येतो. निवडणूक अधिकाऱ्याकडे १७ ब क्रमांकाचा तक्रार अर्ज करून मतपत्रिकेवर शिक्का मारून मतदानाचा हक्क बजावता येतो. मात्र, निकालावर परिणाम करण्याएवढी अल्प तफावत असल्यास हे मतदान विचारात घेऊन मतांची मोजणी करण्यात येते.
खडकवासल्यात ५३ मतपत्रिका बाद
निवडणूक काळात कर्तव्यावर असलेल्या मतदारांना, तसेच ८५ वर्षांपुढील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदार, लष्करी सेवेत कर्तव्यावर असलेल्या जवानांना टपाली मतदानाचा अधिकार आहे. खडकवासल्यात ८२० टपाली मतदान झाले होते. त्यापैकी ५३ मतपत्रिका बाद करण्यात आल्या आहेत.
मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले, पण मतदार यादी सदोष करता आली नाही. मतदानाच्या दिवशी मतदार याद्यांमध्ये प्रचंड चुका पाहायला मिळाल्या. अनेकांची नावे जिवंत असतानाही मयत तर अनेक मयतांची नाव अजूनही मतदान याद्यांमध्ये होती तर दुसरीकडे अनेकांकडे मतदान कार्ड होते, पण मतदार यादीत नावेच नव्हती. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार यादीतून नाव गायब झाल्याने अनेकांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावं लागलं. मागील काही निवडणुकांमध्ये निवडणूक यादीतून नाव गायब होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. निवडणूक आयोगाकडून मतदार यादी अपडेट करण्याचं काम करण्यात येतं. मात्र या मतदार याद्या अपडेट होताना अनेक नाव गाळली जात असल्याचं समोर आला आहे.