रावणगावजवळ खडकवासला कॅनॉल फुटला, शेतकऱ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:10 AM2021-05-27T04:10:45+5:302021-05-27T04:10:45+5:30
रावणगाव येथे खडकवासला कॅनॉलला घळ पडून भिंत पडल्याने ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया गेले. सुदैवाने कुठलीही ...
रावणगाव येथे खडकवासला कॅनॉलला घळ पडून भिंत पडल्याने ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया गेले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी आसपासच्या परिसरातील आर्थिक नुकसान झाले. ओढ्याच्या नजीक असलेल्या विहिरी पाण्याच्या प्रवाहामुळे मातीने बुजून गेल्या. शेती पंप जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे पाण्याखाली गेले, तर काही शेतकऱ्यांचे पाईप वाहून गेले. शेततळ्यांचे बांध फुटले तसेच ताली फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.
ही घटना खडकवासला साखळी क्रमांक १३५/२०० येथे आज बुधवारी (दि. २६) सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी घडली. कालवा फुटल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्याने रावणगाव परिसरात एकच घबराट पसरली. शेतीपंप पाण्याखाली जाऊ नयेत म्हणून सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. तर दुसरीकडे मात्र फुटलेला कॅनॉल आणि पाण्याचा वेग पाहण्यासाठी बघ्यांची मात्र एकच गर्दी उसळली होती.
घटनेचे गांभीर्य ओळखून रावणगाव येथील पाटबंधारे शाखेचे अभियंता विनय पागे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत पाहणी करून वरिष्ठांना कळविले. आणि या कॅनॉलचे पाणी भिगवण ब्रँचकडे आणि तलावात वळविले. आणि त्यानंतर पाटबंधारे खात्याच्या यांत्रिक विभागाच्या मशिनरी आणि टिपर बोलवून दुपारी एक वाजता कॅनॉल दुरुस्तीचे काम चालू केले.
पाटबंधारे खात्याच्या चुकीमुळे घडली घटना.
हा कालव्याला कित्येक वर्षांपासून त्या ठिकाणी गळती होती. परंतु पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचे आरोप येथील शेतकरी वर्गाकडून केला जातो आहे. कालव्याला पाणी आल्यावर गळतीचे पाणी येथील वाड्या-वस्त्यांमध्ये पाझरून रोज लाखो लिटर पाणी वाया जाते. जर रात्री अपरात्री कॅनॉल फुटला तर मोठी मोठी दुर्घटना घडू शकते.
शेततळ्याचा भरावा वाहून गेल्याने नुकसान – सखाराम गाढवे, शेतकरी रावणगाव
कॅनॉल फुटल्याने पाण्याच्या प्रवाहामुळे जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जाते आहे.
कालव्याला थोडासा घळ पडून तो वाढला. ओढ्याच्या जवळच ही घटना झालेली आहे. यापूर्वी येथे गळती वगैरे काही नव्हती त्यामुळे दुर्लक्ष केलेले नाही. पाण्याचा प्रवाह शिर्सुफळ तळ्यात आणि भिगवण बीबीसीकडे वळवून कालवा दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. संध्याकाळपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी करुन पुढील कार्यवाही करू.. विनय पागे
शाखा अभियंता
खडकवासला पाटबंधारे विभाग रावणगाव शाखा