खडकवासला धरण भरले; १७०० क्युसेक्सने विसर्ग सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 01:18 PM2019-07-11T13:18:40+5:302019-07-11T13:54:34+5:30
पुणे शहराच्या दृष्टीने खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा अत्यंत महत्वाचा आहे.
पुणे : खडकवासला धरण ९५ टक्के भरले. बुधवारी (दि. १०) रात्री उशिरा ५०० क्युसेक्स पाणी नदी पात्रात सोडण्यात आले आहे. धरण क्षेत्रात पाऊस अजुनही सुरु असल्यामुळे गुरूवारी (दि.११) रोजी १७०० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता पी. बी. शेलार यांनी केले आहे.
खडकवासला धरण साखळीत आठवडाभरापासून संततधार पाऊस सुरू आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पानशेत धरण क्षेत्रात १६ मिमी पाऊस पडला असून ४.४२ टीएमसी पाणी जमा झाले आहे. वरसगाव धरणक्षेत्रात १६ मिमी पाऊस पडला असून ३.८७ टीएमसी पाणी साठले आहे. टेमघर धरण क्षेत्रात ४० मिमी पाऊस पडला असून ०.५४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर खडकवासला धरण क्षेत्रात ८ मिमी पाऊस पडला असून १.७८ टीएमसी पाणी जमा झाले होते. प्रकल्पातील चारही धरणांत मिळून सध्या १०.६१ टीमएसी एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.
पुणे शहराच्या दृष्टीने खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा अत्यंत महत्वाचा आहे. शहरातीलन नागरिकांना पिण्यासाठी आणि हवेली, दौंड, बारामती आणि इंदापूर यां तालुक्यातील शेतकºयांना सिंचनादृष्टीने या पाण्याचा उपयोग होतो. आठवडाभरापासून धरण साखळीत संततधार पाऊस सुरू असल्याने चार धरणांतील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. जवळपास ३१ टीएमसी क्षमता असलेल्या धरण साखळीत सध्या १०.६१ टीमएसी पाणीसाठा जमा झाला आहे.