खडकवासला पाटबंधारे विभागाची कुरकुंभ एमआयडीसीला नोटीस : उजनी धरणातून घ्यावे पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 11:45 AM2019-06-07T11:45:28+5:302019-06-07T11:57:13+5:30
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राला खडकवासला कालवा व्यवस्थेतून पाणी दिले जाते...
पुणे : कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राने या पुढे उजनी धरणातूनपाणी घ्यावे आणि सध्याचा वापर देखील उजनीतील पाण्यातूनच करावा असे पत्र खडकवासला पाटबंधारे विभागाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) दिले आहे. या निर्णयामुळे बारामती परिसराला अधिकचे पाणी उपलब्ध होणार आहे.
जनाई शिरसाई योजनेतून बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्यातील १२ हजार हेक्टर क्षेत्रास सिंचनासाठी ३.६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला होता. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राला उजनी धरणातून पाणी देण्याचे आदेश राज्यसरकारने ९ सप्टेंबर १९९३ रोजी दिले होते. मात्र २६ वर्षे राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणीच झाली नाही. बारामती परिसराला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. येथील भागाला हक्काचे पाणी मिळावे यासाठी विठ्ठल जराड यांच्यासह काही शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या प्राथमिक विवाद निवारण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या शेतकऱ्यांनीच ही बाब पाटबंधारे विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्याची तातडीने दखल घेत पाटबंधारे मंडळाने या निर्णयाच्या अमंलबजावणीचे आदेश दिले. लोकमतने ३० मे रोजी सर्वप्रथम याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते.
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राला खडकवासला कालवा व्यवस्थेतून पाणी दिले जाते. या कालव्यातून जनाई-शिरसाईच्या अवर्षणग्रस्त भागाला पाणी उपलब्ध होण्यासाठी यानंतरची कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राची गरज उजनी जलाशयातून भागविण्यात यावी. आपणास आवश्यक असणाऱ्या पाणी कोट्याची मागणी स्वतंत्रपणे उजनी जलाशयातून करण्यात यावी. त्याची माहिती कार्यालयास सादर करावी असे पत्र खडकवासला पाटबंधारे विभागाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिक्षक अभियंत्यांना दिले आहे.
खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणात मिळून ३३.७७ टीएमसी प्रकल्पीय साठा आहे. जनाई योजने अंतर्गत तीन टप्प्यात बारामती आणि पुरंदरला सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते. तर, शिरसाई योजनेचा एक टप्पा बारामती व दौंड तालुक्यातील सिंचनासाठी मंजूर करण्यात आला आहे.