खडकवासला भरले, विसर्ग सुरू, चारही धरणांत ९७ टक्के साठा
By नितीन चौधरी | Published: September 30, 2023 06:31 PM2023-09-30T18:31:24+5:302023-09-30T18:32:12+5:30
गेल्या आठवड्यापर्यंत स्थिरावलेल्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पाच्या पाण्यासाठ्यात या आठवड्यात झालेल्या पावसामुळे सुमारे तीन टक्क्यांची वाढ झाली आहे.
पुणे : गेल्या आठवड्यापर्यंत स्थिरावलेल्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पाच्या पाण्यासाठ्यात या आठवड्यात झालेल्या पावसामुळे सुमारे तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या खडकवासला ९७ टक्के अर्थात २८ एमसी पाणीसाठा जमा झाला आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे खडकवासला धरण १०० टक्के भरल्याने धरणातून सायंकाळी ५ वाजता २ हजार १४० क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. या प्रकल्पातील टेमघर वगळता सर्व धरणे भरली आहेत.
ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने खडकवासला प्रकल्पातील धरणे भरणार की नाहीत याची चिंता जलसंपदा विभागाला होती. पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्यासह जिल्ह्यातील शेतीचे सिंचन याच चार धरणांवर अवलंबून असल्याने पाणीसाठा शंभर टक्के होणे गरजेचे होते. मात्र, सप्टेंबरमध्ये झालेल्या काही पावसामुळे हा साठा ९४ टक्क्यांपर्यंत झाला. पावसाने पुन्हा ओढ दिल्याने त्यात फारशी वाढ होत नव्हती. गेल्या चार-पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे घरणांच्या पाणीसाठ्यात सुमारे तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे सध्या या प्रकल्पातील पाणीसाठा २८.३८ टीएमसी अर्थात ९७.३६ टक्के झाला आहे. गेल्या वर्षी हाच साठा २९.१० टीएमसी अर्थात ९९.८३ टक्के इतका होता. तर खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे शुक्रवारी मध्यरात्री विसर्ग सुरू करण्यात आला. सुरुवातीला हा विसर्ग ८५६ क्युसेक करण्यात येत होता. त्यानंतर पावसाचा जोर वाढल्याने विसर्ग १ हजार ७१२ क्युसेक करण्यात आला. त्यानंतर शनिवारी पहाटे ३ वाजता पाऊस पुन्हा वाढल्याने विसर्ग २ हजार ५६८ क्युसेक करण्यात आला. तर पाऊस कमी झाल्याने सायंकाळी ५ वाजता हा विसर्ग २ हजार १४० क्युसेक करण्यात आला.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन-चार दिवसांत पुणे शहर व घाट परिसरात चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाणलोट परिसरातही पाऊस झाल्यास धरणे पूर्ण भरतील अशी आशा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कालवा सल्लागार समितीची येत्या १५ ऑक्टोबरला बैठक होणार आहे. धरणे भरल्यास शेतीसाठी दिल्या जाणाऱ्या आवर्तनाबाबत तसेच पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्यासंदर्भात यात निर्णय होणार आहे. सध्या तरी पाणलोटात होणाऱ्या पावसामुळे धरणे भरण्याची आशा असल्याने पुण्याच्या पिण्याच्या पाण्यासंदर्भात कपात केली जाणार नाही, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
पाणीसाठा
धरण टीएमसी टक्के
- खडकवासला १.९७--१००
- पानशेत १०.६५--१००
- वरसगाव १२.८२--१००
- टेमघर २.९४--७९.२१
- एकूण २८.३८--९७.३६
- मागील वर्षाचा साठा
- २९.१० टीएमसी --९९.३८ टक्के