खडकवासला प्रकल्पात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा नऊ टक्के जास्त पाणीसाठा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 11:52 AM2021-07-07T11:52:07+5:302021-07-07T11:52:14+5:30
पुण्यात गेल्या १५ दिवसात पाऊस न होता झालेली वाढ हि दिलासादायक बाब
पुणे: खडकवासलाधरण प्रकल्पात मे महिन्यात पाऊस पडला होता. त्यांनतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली. सद्यस्थितीत पावसाने दांडी मारली असली तरी खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे मिळून २९. १५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागच्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत २०.१५ टक्के पाणी जमा झाले होते. त्यामधे आता ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
गेल्या १५ दिवसात पाऊस अजिबात झालाच नाही. खडकवासला येथे काल १५ मिलिमीटर पाऊस झाला होता. मात्र तिन्ही धरण क्षेत्रात पावसाने दांडी मारली. परंतु जूनच्या पावसाने पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली होती. पण मध्यंतरी पाऊस थांबल्याने ती वाढ पुन्हा थांबली. परिणामी धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकली नाही. तरीही दिलासादायक बाब म्हणजे आता मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे.
मंगळवारी सायंकाळपर्यंत खडकवासला प्रकल्पात चारही धरणे मिळून ८.६६ टीएमसी म्हणजेच २९.१५ टक्के पाणी जमा झाले आहे. अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे अधिकारी कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाणीसाठा
मागील वर्षी आजच्या दिवशी चारही धरणे मिळून ५.८७ टीएमसी म्हणजे २०.१५ टक्के पाणी जमा झाले होते. आता त्यामध्ये २.७९० टीएमसी म्हणजेच ९.५७ टक्के पाणी जास्त जमा झाले आहे.