खड्डेमुक्त अभियान भोसरीमध्ये सुरू
By admin | Published: June 27, 2015 03:49 AM2015-06-27T03:49:45+5:302015-06-27T03:49:45+5:30
पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे, त्यामुळे होणारे अपघात, चौकाचौकांत साचणारे पाणी या त्रासातून भोसरीकरांची सुटका होण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी
भोसरी : पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे, त्यामुळे होणारे अपघात, चौकाचौकांत साचणारे पाणी या त्रासातून भोसरीकरांची सुटका होण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी ‘खड्डेमुक्त भोसरी’ अभियान सुरू केले आहे. एसएमएस अथवा ई-मेलद्वारे तक्रार केल्यानंतर २४ तासांच्या आत खड्डा दुरुस्ती करण्यात येईल, अशी माहिती आमदार लांडगे यांनी दिली आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार लांडगे विविध अभिनव उपक्रम राबवत आहेत. दर वर्षी पावसामुळे अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडतात. खड्डे पावसामुळे दुरुस्त करता येणार नाहीत, असे स्थापत्य विभागाचे अधिकारी सांगतात. पावसाळा सुरू झाल्याने नेहमीच उद्भवणाऱ्या खड्डे प्रश्नाने पुन्हा एकदा उग्र रूप धारण केले आहे. औद्योगिक परिसर, लगतची समाविष्ट गावे, भोसरी गावातील वर्दळ यांमुळे भोसरी आणि परिसरामध्ये खड्ड्यांचा प्रश्न तीव्र आहे. पावसाळ्यात लहान-मोठे अपघात खड्ड्यांमुळे घडतात. सखल भागात पाणी साचते. त्याचा वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यंदा या त्रासातून काही अंशी का होईना, सुटका होण्याची शक्यता आहे. आमदार लांडगे यांनी मागील दोन दिवसांपासून खड्डेमुक्त भोसरी अभियान सुरू केले आहे. त्यासाठी लांडगे यांनी स्वत:चे काही कार्यकर्ते व महापालिका अधिकाऱ्यांची एक ‘टीम’ तयार केली आहे. मतदारसंघातील नागरिकांची तक्रार आल्यास १२ ते २४ तासांच्या आत महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी आणि स्थापत्य विभागाच्या मदतीने खड्डा दुरुस्ती केली जाणार आहे. पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाणी निचऱ्याची व्यवस्था केली जाणार आहे. (वार्ताहर)