खडकी कॅन्टोन्मेंट आर्थिक संकटात
By Admin | Published: May 12, 2014 03:47 AM2014-05-12T03:47:23+5:302014-05-12T03:47:23+5:30
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डात एलबीटी सुरू करण्याबाबत संरक्षण मंत्रालयाकडून अद्याप मंजुरी न मिळाल्याने बोर्डाला आर्थिक स्थिती सांभाळताना तारेवरील कसरत करावी लागत आहे.
मिलिंद कांबळे, पिंपरी - खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डात एलबीटी सुरू करण्याबाबत संरक्षण मंत्रालयाकडून अद्याप मंजुरी न मिळाल्याने बोर्डाला आर्थिक स्थिती सांभाळताना तारेवरील कसरत करावी लागत आहे. कारभार सुरळीत ठेवण्यासाठी इतर मार्गाने महसूल वाढीवर भर देण्यात येत आहे. गेल्या वर्षी १ एप्रिलपासून पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेत एलबीटी सुरू करण्यात आली. त्याच काळात यासंदर्भात बोर्डाने निर्णय घेऊन एलबीटी प्रक्रिया राबविण्यास केंद्राकडे मंजुरी मागितली होती. त्याबाबत वारंवार पाठपुरावा केला जात आहे. मात्र, अद्याप यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे बोर्ड व्यापार्यांकडून एलबीटी गोळा करू शकत नाही. एलबीटी सुरू झाल्याने जकात बंद झाली. याद्वारे पुणे पालिकेकडून महिन्यास एक ते सव्वा कोटी रुपये महसूल बोर्डास मिळत होता. हे उत्पन्न गेल्या एप्रिल महिन्यापासून मिळत नाही. त्यास १३ महिने उलटले आहेत. या काळातील सुमारे १८ ते २० कोटी रुपयांची तूट आली आहे. यामुळे बोर्डाची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. कर्मचार्यांचे वेतन देणे अवघड झाले आहे.