‘सेंट्रल पोल’च्या माध्यमातून ‘खाऊगिरी’
By admin | Published: March 27, 2017 03:31 AM2017-03-27T03:31:19+5:302017-03-27T03:31:19+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांतील काही सेवकांना अतिरिक्त कामाच्या नावाखाली हजारो रुपये दिले जात
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांतील काही सेवकांना अतिरिक्त कामाच्या नावाखाली हजारो रुपये दिले जात आहेत . त्यातही विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘सेंट्रल पोल’च्या माध्यमातून विभागांकडून राबविल्या जाणाऱ्या प्रकल्प व कार्यक्रमांच्या रकमेमधील १५ टक्के निधीचे वाटप काही वर्षांपासून केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विद्यापीठातर्फे या सर्व आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली जाणार आहे.
विद्यापीठाच्या विविध विभागांना यूजीसीसह केंद्रच्या विविध मंत्रालयांच्या माध्यमातून प्रकल्प प्राप्त होतात. तसेच प्राध्यापकांकडूनही काही संशोधन प्रकल्प राबविले जातात. त्यासाठी विभागांना व प्राध्यापकांना कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त होतो. विद्यापीठाला प्राप्त झालेल्या निधीतून राबविले जाणारे संशोधन प्रकल्प आणि कार्यक्रमाचे आर्थिक ताळेबंद ठेवण्याचे काम वित्त व लेखा विभागाने नियमित काम म्हणूनच करणे अपेक्षित आहे. मात्र, या विभागाकडून त्यास अतिरिक्त काम समजून त्या बदल्यात १५ टक्के रक्कम आकारली जाते. तसेच ही रक्कम अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समसमान पद्धतीने वाटून घेतली जाते. केवळ वित्त व लेखा विभागाकडूनच नाही तर परीक्षा विभाग,आरक्षण विभागासह इतरही प्रमुख विभागातील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाच्या नावाखाली हजारो रुपये दिले जात आहेत.
विद्यापीठाच्या वित्त व लेखा अधिकारी विद्या गारगोटे म्हणाल्या, ‘‘विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने केलेल्या ठरावानुसारच वित्त व लेखा विभागातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या मोबदल्याची रक्कम दिली जाते. विद्यापीठातील कामाव्यतिरिक्त केल्या जाणाऱ्या अतिरिक्त कामासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन व इतर भत्ते दिले जातात. मी विद्यापीठात रुजू होण्यापूर्वीपासून विद्यापीठाच्या सेवकांना अतिरिक्त कामाचा मोबदला देण्याची पद्धत आहे.’’
(प्रतिनिधी)
गेल्या महिन्यात झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यापीठातील सेवकांना अतिरिक्त कामासाठी दिल्या जाणाऱ्या निधी संदर्भात चर्चा झाली होती. विद्यापीठातील सेवकांना सन २000 पूर्वीपासून व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयानुसार अतिरिक्त कामाचे मानधन दिले जात असल्याचे दिसून येते. मात्र, नियमित कामांनाही अतिरिक्त काम समजून त्याचा मोबदला घेतला जात असेल तर ते योग्य ठरणार नाही. त्यामुळे विद्यापीठातील सर्व आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यासाठी लवकरच समिती नेमली जाईल. समितीचा अहवाल पुढील व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठेवून योग्य निर्णय घेण्यात येईल.
- डॉ. वासुदेव गाडे,
कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ