खराडी अपघातातील चालकाकडे वाहन परवाना नसल्याचे उघड, पोलीस कोठडीचे हक्क अबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 01:13 AM2018-09-22T01:13:50+5:302018-09-22T01:13:55+5:30
वाहन चालविण्याचा परवाना नसतानादेखील खराडी येथील अपघातातील आरोपी चारचाकी वाहन चालवत असल्याची बाब समोर आली आहे.
पुणे : वाहन चालविण्याचा परवाना नसतानादेखील खराडी येथील अपघातातील आरोपी चारचाकी वाहन चालवत असल्याची बाब समोर आली आहे. बेदरकारपणे मोटार चालवून आजी-नातवाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणात चंदननगर पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाची रवानगी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली.
ओळख परेडसाठी पोलीस कोठडी घेण्याचे हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यासाठी पोलिसांनी केलेला अर्ज ग्राह्य
धरत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांनी हा आदेश दिला आहे. सौरभ शशिकांत जासूद (वय २०, रा. चंदननगर) असे त्याचे नाव आहे. खराडी येथील टस्कन सोसायटीसमोर बुधवारी (दि. १९)
रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली होती.
याबाबत दिलीप रामभाऊ लोखंडे (वय ४२, रा. खराडी) यांनी फिर्याद दिली आहे. जासूद याने मोटार वेगाने चालवून आजी शांताबाई साहेबराव सोनवणे (वय ६१) आणि नातू नयन रमेश मोकळे (वय ११) यांना धडक दिली. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला तर फिर्यादी जखमी झाले आहेत. चार वाहनांनाही धडक देण्यात आली होती. अपघातानंतर जासूद फरार झाला होता. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. बचाव पक्षातर्फे अॅड. अशोक संकपाळ यांनी
काम पाहिले.
>प्रकरण दाबण्याचा प्रयत्न
जासूद यांचे वडील पुणे महानगरपालिकेत अधिकारी आहेत. त्याचे चुलते शिरूर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य असल्याने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप मृत्यू झालेल्यांच्या नातेवाइकांनी केला होता. पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक करावी, यासाठी परिसरातील नागरिकांना गुरुवारी रास्ता रोको देखील केले होते. वाहनावरील वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे दिसून येते. आरोपीने मद्यपान केले होते की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती या प्रकरणातील तपासी अधिकारी चंदननगर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक यांनी दिली.