कुटुंब कोरोनाबाधित तरीही खाकी बजावतेय कर्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:11 AM2021-05-09T04:11:23+5:302021-05-09T04:11:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगवी : पोलिसांची कामावर येण्याची वेळ ठरलेली असते. मात्र, कधीकधी अधिक कामकाज, ताण-तणाव तसेच कायदा सुव्यवस्थेचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगवी : पोलिसांची कामावर येण्याची वेळ ठरलेली असते. मात्र, कधीकधी अधिक कामकाज, ताण-तणाव तसेच कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात. यामुळे त्यांना घरी न जाता कर्तव्यबजावत सेवा बजावावी लागते. कामाच्या व्यापामुळे जेवणालाही कधीकधी वेळ नसतो, तरीही कुणाकडे तक्रार न करता पोलीस आपली कामगिरी चोखपणे बजावत असतात. आजच्या घडीला कुटुंबात एखाद्या व्यक्तीला जरी कोरोना झाला, तरी संपूर्ण कुटुंब काळजीपोटी अस्वस्थ होते. मात्र, गेल्या ८ दिवसांपासून कुटुंबातील पत्नी, दोन मुली कोरोनाबाधित असूनही माळेगाव दूरक्षेत्र येथे कर्तव्य बजावणारे पोलीस हवालदार जयंत ताकवणे हे रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावत आहेत.
ताकवणे यांच्या घरात त्यांची पत्नी, दोन मुली कोरोना बाधित आहेत. मात्र, तरीही खचून न जाता सर्व प्रथम कुटुंबाची काळजी घेणे हे आदी कर्तव्य असताना देखील, जगावर ओढावलेल्या संकटसमयी प्रथम कर्तव्याला त्यांनी प्राधान्य दिले. या कृतीतून त्यांनी पोलिसांच्या ब्रीदवाक्य असलेले 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे प्रत्यक्षात उतरवले आहे.
कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने माळेगाव हे हॉटस्पॉट क्षेत्र बनले आहे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आदराने बोलून त्यांच्या अडचणी ऐकून घेऊन त्यांना योग्य सल्ला देण्याचे कामही जयंत ताकवणे चोखपणे बजावत आहे.
चौकट
एकीकडे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न केले जात
आहेत. तर, त्यासाठी दुसरीकडे कायदा सुव्यवस्था अबाधित राहून लोकांना घरातच
बसण्यासाठी पोलिसांवर अधिकचा ताण आहे. त्यातही दिवसातून शेकडो लोकांशी
पोलिसांचा संपर्क येतो. विविध प्रकारच्या तक्रारी ऐकून घ्यायच्या. अशा
वेळी संसर्ग झालाच तर कुटुंबीयांचे काय होणार, असे एक ना अनेक प्रश्न
त्यांना पडतात. तरीही कोरोनाची डोक्यावर टांगती तलवार घेऊन सर्वच पोलीस
अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर निःस्वार्थपणे काम करीत आहेत. पोलीस त्यांच्याप्रमाणे परिस्थिती हाताळत आहेत. कधी प्रेमाने, तर कधी कडक शिस्तीचा धाक दाखवून या टवाळखोरांना वेळप्रसंगी चांगलाच 'प्रसाद’ देण्याचे काम करत आहेत. मात्र,
कायदा-सुव्यवस्था राखताना जनतेच्या रोषालाही सामोरे जावं लागत आहे.
मात्र, तरीही बारामतीचे सर्व पोलीस प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत आहेत.
याबाबत बारामतीच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने ताकवणे यांचे कौतुकास्पद
अभिनंदन केले.
फोटो ओळी : पोलीस हवालदार जयंत ताकवणे