औंध हाॅस्पिटलमध्ये खांदेपालट, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकपदी डाॅ. काेलाेड; डाेईफाेडे रजेवर
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: March 27, 2024 03:32 PM2024-03-27T15:32:26+5:302024-03-27T15:33:45+5:30
रुग्णालयात उच्छाद मांडलेल्या कर्मचा-यांचा वरिष्ठ अधिका-यांनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याने येथे प्रामाणिकपणे काम करणा-या कर्मचारी वर्गात समाधानाचे वातावरण आहे....
पुणे : औंध जिल्हा रुग्णालयातील अनागाेंदी कारभार चव्हाट्यावर आल्यावर आता येथे वरिष्ठ स्तरावरून माेठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत. आराेग्य उपसंचालकांनी येथील अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक पदाची तात्पुरती जबाबदारी येरवडा मनाेरुग्णालयातील उपअधीक्षक डाॅ. श्रीनिवास काेलाेड यांच्याकडे साेपवली आहे. तर, एका कर्मचा-याची लाेहगाव उपजिल्हा रुग्णालयात बदली केली असून सहायक जमादाची रवानगी त्याच्या मुळ सेवक या पदावर केली आहे. रुग्णालयात उच्छाद मांडलेल्या कर्मचा-यांचा वरिष्ठ अधिका-यांनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याने येथे प्रामाणिकपणे काम करणा-या कर्मचारी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
जिल्हा रुग्णालयात कामकाज बंद करून अन्य डाॅक्टरांसाेबत गप्पा मारत बसणे, चतुर्थश्रेणी कामगारांचे चुकीचे नियोजन, ओपीडीमध्ये न जाणे, रुग्ण न तपासणे, आणीबाणीवेळी रात्रीच्या वेळी उपलब्ध नसणे, इमर्जन्सीमध्ये रात्री प्रसुतीसाठी आलेल्या गरोदर मातांना ससूनला पाठवणे, अस्वच्छतेकडे दुर्लक्ष आदी तक्रारींची शहानिशा केल्यावर पुणे परिमंडळचे आराेग्य उपसंचालक डाॅ. राधाकिशन पवार यांनी येथील अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. वर्षा डाेईफाेडे यांची नुकतीच बदली प्रस्तावित केली हाेती. तेव्हापासून डाॅ. डाेईफाेडे या वैदयकीय रजेवर गेल्या आहेत.
डाॅ. डाेईफाेडे रजेवर गेल्यावर त्या पदाची अतिरिक्त जबाबदारी तेथील डाॅ. अंजली माेहाेळकर यांना दिली हाेती. परंतू, डाॅ. माेहाेळकर यांनीही काेणतीही पुर्वसूचना न किरकाेळ रजेचा अर्ज देउन रजेवर गेल्या. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक हे पद महत्वाचे असल्याने ते रिक्त ठेवता येत नसल्याने या पदावर पुढील आदेश येईपर्यंत डाॅ. काेलाेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.