खंडेरायाच्या पालखी सोहळा, 'येळकोट, येळकोट'च्या गजरात मर्दानी दस-याचा उत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2017 09:40 PM2017-09-30T21:40:16+5:302017-09-30T21:40:27+5:30
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत दरवर्षी पारंपरिक पद्दतीने ''मर्दानी दस-याचे'' आयोजन केले जाते. 15 तासांपेक्षाही जास्त काळ चालणारा जेजुरीचा दसरा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक जेजुरीत येत असतात
जेजुरी - महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत दरवर्षी पारंपरिक पद्दतीने ''मर्दानी दस-याचे'' आयोजन केले जाते. 15 तासांपेक्षाही जास्त काळ चालणारा जेजुरीचा दसरा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक जेजुरीत येत असतात. येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात आणि भंडा-याच्या उधळणीत, फटाक्यांच्या आतषबाजीत या मर्दानी दस-याला सुरुवात करण्यात आली.
मल्हारी मार्तंड ! जय मल्हार ! जल्लोषाने ओथंबलेले स्वर आणि भंडार्याच्या मुक्त उधळणीने आसमंताला आलेले पिवळेपण! हे ठिकाण आहे उत्साह, आनंद आणि शक्तीची प्रेरणा अवघ्या महाराष्ट्राला देणार्या खंडेरायाच्या जेजुरीचे, तीर्थक्षेत्र जेजुरीत धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक अशा मर्दानी दस-याला जल्लोषात सुरुवात झालेली आहे. उद्या सकाळपर्यंत म्हणजे 15 तासांपेक्षाही जास्त काळ हा मर्दानी दसरा चालणार आहे. दस-यानिमित्त जेजुरी गडावर संपूर्ण रोषणाई करण्यात आली होती. हा पालखी सोहळा रामण्याकडे सिमोल्लंघनासाठी नेण्यात आला . त्या ठिकाणी श्री. मार्तंड भैरवाचे मूळ ठिकाण कडेपठार मंदिरातील उत्सव मूर्तींना आणण्यात आले.या ठिकाणी देवभेटीचा विलोभनीय सोहळ्यानंतर पालखी सोहळा मुख्यरस्त्याने सकाळी गडावर पोहोचला आणि त्यावेळी मानाची असणारी 42 किलो वजन असणा-या तलवारीचे मर्दानी खेळ खेळण्यात आले आणि पालखी सोहल्याचा समारोप उत्साहात पार पडला.