Navratri 2022: खंडोबाच्या जेजुरी गडावर घटस्थापना; नवरात्रोत्सवास प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 03:43 PM2022-09-26T15:43:48+5:302022-09-26T15:43:57+5:30
मुख्य मंदिरांसह गडकोट, शहरातील ऐतिहासिक मंदिरांना विद्युत रोषणाई
जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत प्रचलित असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर विधिवत घटस्थापना करण्यात येऊन नवरात्रोत्सवास प्रारंभ करण्यात आला. यावेळी विश्वस्त ,पुजारी ,सेवेकरी ,ग्रामस्थ मानकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोमवारी( दि.२६) सकाळच्या सुमारास मुख्य मंदिरात विधिवत "पाकाळणी "( देवांचा गाभारा स्वच्छ करणे)करण्यात येऊन नवी मुंबई येथील खंडोबाभक्त संजय रामू जाधव यांच्या वतीने अर्पण करण्यात आलेले नवीन पोशाख मुख्य मार्तंड भैरव मूर्तींसह खंडोबा -म्हाळसादेवींच्या उत्सव मूर्तींना परिधान करण्यात आले.
त्यानंतर सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास सनई चौघड्याचा मंगलमय सुरात उत्सवमूर्ती गडकोट आवाराला प्रदक्षिणा मारून रंगमहाल - बालद्वारी येथे आणण्यात आल्या आणि वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी यांच्या मंत्रपठणात विधिवत घटस्थापना करण्यात आली. यावेळी पुजारी चेतन सातभाई, मिलिंद सातभाई, आशिष बारभाई, मयूर दीडभाई, गणेश आगलावे, संतोष आगलावे, सुधाकर मोरे, समीर मोरे, श्रीकांत लांघी, आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य मंदिरातील आवारात घटस्थापना झाल्यानंतर शहरातील घराघरात घट बसविण्यास सुरुवात झाली.
जेजुरी गडावर आजपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला असून मुख्य मंदिर गाभारा पानाफुलांनी सजविण्यात आला आहे. शहरातील युवकांच्या खंडा सरावाला रात्री सुरुवात होणार आहे. नवरात्रोत्सवात परिसरातील लोककलावंत बालद्वारी मध्ये हजेरी लावणार आहेत. मुख्य मंदिरांसह गडकोट, शहरातील ऐतिहासिक मंदिरांना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.