खंडोबा पावला आणि मुका सोन्या वाचला!
By admin | Published: September 14, 2016 03:39 AM2016-09-14T03:39:19+5:302016-09-14T03:39:19+5:30
खरं म्हणजे जेजुरीचा खंडेराया हा देव नवसाला पावणारा देव म्हणून भाविकांची धारणा आहे. याची प्रचीतीही खंडोबाभक्त असलेल्या पुण्याच्या महाडिक परिवाराला आली आहे
जेजुरी : खरं म्हणजे जेजुरीचा खंडेराया हा देव नवसाला पावणारा देव म्हणून भाविकांची धारणा आहे. याची प्रचीतीही खंडोबाभक्त असलेल्या पुण्याच्या महाडिक परिवाराला आली आहे. लोक देवाजवळ नवस करतात आणि देवाचा नवस फेडला जातो, अशा खंडोबा देवाबाबत शेकडो घटना पाहावयास मिळतात.
महाडिक परिवाराचा हा नवस माणसाकरता नव्हता, तर चक्क पाळीव श्वान (कुत्रा) सोन्या याच्याकरिता होता. अडीच महिन्यांच्या लाडक्या सोन्याला अचानक ताप आला आणि लकवा मारला होता. सुमित सीताराम महाडिक यांच्या घरात हा श्वान लहानपणापासूनच वाढला होता. त्यामुळे तो कुत्रा नसून आपल्याच घरातील एक सदस्य समजून त्याचे पालनपोषण केले जात होते.
परंतु सोन्या अचानक आजारी पडला आणि महाडिक कटुंब हतबल झाले होते.
पुण्यातील अनेक पशू व वन्यजीव डॉक्टर यांना दाखवण्यात आले. परंतु हा काही दिवसांचाच सोबती असल्याचे सांगण्यात आले. म्हणून खंडोबाचा धावा करण्यात आला. ‘देवा, आमच्या सोन्याला बरे कर, सव्वा किलो भंडारा वाहीन,’ असा नवस जनाबाई यांनी केला.
अवघ्या काही कालावधीतच सोन्याने डोळे उघडले व
तो भुंकू लागला. या वेळी मात्र महाडिक परिवारला आनंद आवरता येईना. त्यांनी खंडोबाचा जयजयकार केला. सोमवारी अनिल महाडिक, नंदकुमार धुरकर, सर्व परिवार सोन्याला घेऊन नवस फेडण्याकरिता जेजुरीत आले होते. या वेळी श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्त वसंत नाझीरकर यांनी सोन्यावर भंडारा उधळला. (वार्ताहर)