मुस्लिम कुटुंबाकडून खंडेरायाची सेवा; पिंपरीच्या महंमदभाईंकडून ‘पंचकल्याणी अश्व’ अर्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 02:51 PM2023-03-21T14:51:40+5:302023-03-21T14:51:50+5:30
संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या कुटुंबाला हा मान मिळणे आम्ही भाग्याचे समजतो
रोशन मोरे
पिंपरी : जेजुरी गडावर सोमवती अमवास्येनिमित्त यात्रा भरते. भंडाऱ्याची उधळण करीत देवाची पालखी निघते. या पालखीसमोर देवाचा ‘पंचकल्याणी अश्व’ चालतो. परंपरागत या अश्वाचा मान मुस्लिम कुटुंबाकडे आहे. पिंपरी चिंचवडचे माजी उपमहापाैर महंमदभाई पानसरे यांच्या कुटुंबाला हा मान मिळाला असून, ते समर्थपणे ही जबाबदारी निभावत आहेत. पानसरे कुटुंबाकडून लवकरच नवीन ‘पंचकल्याणी अश्व’ देवस्थानकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे देवस्थानकडे सुपूर्द करण्यात येणाऱ्या अश्वाला संभाळण्याचा मान देखील जेजुरीतील मुस्लिम खान कुटुंबीयांकडे आहे.
‘पंचकल्याणी अश्वा’वर साक्षात खंडोबाराया विराजमान होत असल्याने या अश्वाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेष गुण असणारा हा ‘पंचकल्याणी अश्व’ शोधण्याचे काम पानसरे कुटुंबीय करते. अश्व शोधून तो जेजुरी संस्थानकडे सुपूर्द करेपर्यंत त्याची सारी जबाबदारी पानसरे कुटुंबीयांवर असते.
तब्बल दीड वर्ष शोध
सध्या देवाच्या सेवेत असलेला ‘पंचकल्याणी अश्व’ २० वर्षांपूर्वी पानसरे कुटुंबाकडून देवस्थानकडे सुपूर्द करण्यात आला होता. हा अश्व वृद्ध होत असल्याने तीन ते चार वर्षांपासून ‘पंचकल्याणी अश्वा’चा शोध सुरू होता. विशेष गुण असलेला ‘पंचकल्याणी अश्व’ अकलूजमध्ये पानसरे कुटुंबाला मिळाला. अवघ्या २० दिवसांचा असलेला हा अश्व पानसरे कुटुंबाने घेतला.
अश्वाला केले जाणार तयार
पानसरे कुटुंबीयांकडून देवस्थानकडे सुपूर्द करण्यात येणार अश्व दोन वर्षांचा असून, तपकरी रंगाचा आहे. त्याच्या चेहऱ्यावर, तसेच पायावर पांढरा रंग आहे. हा अश्व देवस्थानकडे सुपूर्द केल्यानंतर त्याला यात्रा महोत्सवासाठी देण्यात येईल. या अश्वाला भंडाऱ्याची आणि माणसांची सवय नाही. तीन लाख भाविक यात्रेला उपस्थित राहत असल्याने माणसांच्या गर्दीची सवय या अश्वाला करून देण्यात येईल, असे अश्वाचा सांभाळ करणाऱ्या खान कुटुंबातील बंटी खान यांनी सांगितले.
पंचकल्याणी अश्वाची वैशिष्ट्ये
पंचकल्याणी घोडा खासकरून देवाचे वाहन म्हणून वापरला जातो. त्याचे चारही ढोपर शुभ्र असतात, डोळे घारे असतात. या दोन डोळ्यांना ‘जयमंगल’ असे म्हटले जाते. या घोड्याच्या जन्मापासून त्याच्यावर कोणीही बसलेले नसते. सर्वाधिक किमतीचा घोडा म्हणूनदेखील पंचकल्याणी घोडा प्रसिद्ध आहे.
''श्रीक्षेत्र जेजुरी खंडोबा देवाच्या अश्वाचे मानकरी आमचे कुटुंब आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या कुटुंबाला हा मान मिळणे आम्ही भाग्याचे समजतो आणि या मानाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. - महंमदभाई पानसरे, खंडोबा देवाच्या अश्वाचे मानकरी, माजी उपमहापौर पिंपरी-चिंचवड''
''अठरा पगड जातीतील कुटुंबांना देवाचा मान आहे. त्यात देवाचा पंचकल्याणी अश्व सांभाळण्याचा मान आम्हा मुस्लीम कुटुंबाला मिळणे हे भाग्य समजतो. - बंटी खान, खंडोबा देवाचे मानकरी''