खंडोबाची जेजुरी रंगपंचमीनिमित्त झाली रंगबेरंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 03:26 PM2021-04-02T15:26:55+5:302021-04-02T15:28:05+5:30
खंडोबाच्या गाभाऱ्यात विविध रंगांची सजावट
जेजुरी: आज रंगपंचमीनिमित्त रोज पिवळ्या धमक सोनेरी रंगाच्या जेजुरी गडावरचा खंडोबा देव आज विविध रंगांनी न्हाऊन निघाला आहे. जेजुरी गडावर रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात आला.
मुख्य भैरवनाथ मूर्तींना रंग लावून अनोखी पूजा -अभिषेक करण्यात आला. भारतीय लोककला संस्कृतीमधील लोकदेव आणि बहुजन बांधवांचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाचे वर्षातील जत्रा -यात्रा ,सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यातूनच बहुरंगी -बहुढंगी लोककला संस्कार परंपरेचे आणि सामाजिक बांधिलकीचे अनोखे दर्शन येथे घडत असते. याच सण उत्सवांची परंपरा म्हणून कुलदैवताची राजधानी असलेल्या जेजुरीच्या गडावर खंडेरायाची रंगपंचमी श्रद्धेने साजरी करण्यात आली.
पहाटेची भूपाळी पूजा - अभिषेक व आरती झाल्यानंतर मुख्य भैरवनाथ मूर्तींसह स्वयंभू लिंगाला विविध रंग लावण्यात येऊन देवांची रंगपंचमी साजरी करण्यात आली होती. देवांना रंग लावल्यानंतर शहरामध्ये सणाच्या उत्साहाला उधाण आल आणि रोज पिवळी होणारी जेजुरी आज वेगवेगळ्या रंगात बुडालेली दिसली.