खराडीतील एटीएमवर २१ लाखांचा दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 02:07 AM2019-02-28T02:07:06+5:302019-02-28T02:07:09+5:30
शहरामधील दरोड्याचा हा सलग दुसरा प्रकार
चंदननगर : खराडीतील एसबीआयच्या एटीएममधून चोरट्यांनी मध्यरात्रीच्या वेळी २१ लाखांची रक्कम चोरी केल्याची घटना घडली. याबाबत, चंदननगर पोलीस ठाण्यात इराप्पा चंदप्पा मेलकेरी (वय ३०, रा. ससाणेनगर, हडपसर) या एसबीआयच्या कंत्राटदाराने फिर्याद दिली.
चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : दि.२६ रोजी रात्री १०.५२ ते दि.२७ रोजी पहाटे ०४.४३ वाजण्याच्या दरम्यान खराडीरोडवरील यशवनगर या भागातील पंचरत्न अपार्टमेंट मधील स्टेट बँक आॅफ इंडियाचे हे एटीएम चोरट्यांनी फोडले. चोरट्यांनी एटीएम मशिनचा दरवाजा गॅस कटरच्या साह्याने कापला. गॅस कटरमुळे काही २०० रुपयांच्या नोटा जळाल्या, त्या जळालेल्या नोटा तिथेच टाकल्या. या एटीएममधील २१,४९,५०० रुपयांची रक्कम चोरी करून नेली. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक एस. पी. भोसले हे करत आहेत.
पिंपळे गुरव येथील बँक आॅफ इंडियाच्या एटीएम मशीनची मागील बाजू गॅस कटरने कापून त्यातील कॅश बॉक्समधील ६ लाख ७५ हजार रुपये चोरुन नेण्याचा प्रकार २० फेब्रुवारी रोजी उघडकीस आला होता़ चोरट्यांनी कॅश बॉक्समधील पैसे चोरुन नेल्यावर शटर बंद केल्याने दोन दिवस हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नव्हता़