खरीप पिकांनाही बसला अतिवृष्टीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:10 AM2021-07-27T04:10:36+5:302021-07-27T04:10:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्याच्या काही भागात झालेल्या अतिवृष्टीचा फटका खरीप हंगामालाही बसणार आहे. शेतजमिनीचा वरचा थर वाहून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्याच्या काही भागात झालेल्या अतिवृष्टीचा फटका खरीप हंगामालाही बसणार आहे. शेतजमिनीचा वरचा थर वाहून गेला असल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
रत्नागिरी, चिपळूण, रायगड, अकोला व परिसर, पश्चिम महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. खरिपाच्या यंदाच्या हंगामातील ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. भातलावणीही जवळपास पूर्ण झाली आहे.
काही क्षेत्रात पिकाची उगवणही सुरू झाली होती. नेमक्या अशाच वेळी पाऊस झाल्याने पिकांची हानी होण्याची शक्यता आहे. शेतजमिनीच्या पहिल्या १५ सेंटीमीटरच्या थरात पिकांना पोषक अशी बरीच द्रव्ये असतात. प्रामुख्याने सुरुवातीच्या पांढऱ्या मुळांना या थरामुळे मोकळी हवा मिळते. हा थर जोराच्या पावसात वाहून गेला तर मुळे उघडी पडतात, वाढ खुंटते व त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो, असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
अकोला जिल्ह्यात जुलैअखेर १३५ हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, तूर, कापूस, मूग, उडीद या पिकांचा यात समावेश आहे. कोकण पट्टीतही मुसळधार पावसाने शेती क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी अद्याप सुरू आहे. कोल्हापूर परिसरातील काही क्षेत्रात खरिपाला जास्तीच्या पावसाचा फटका बसेल असा अंदाज आहे.
पुणे जिल्ह्यात १०७ तक्रारी
पुणे जिल्ह्यात जास्तीच्या पावसाची विशेष नोंद नाही. तरीही कृषी विभागाकडे पावसामुळे नुकसान झाल्याच्या १०७ तक्रारी आल्या आहेत. त्यातील १०४ भातपिकाच्या मुळशी, मावळ, आंबेगाव परिसरातील आहेत. उर्वरित ३ तक्रारी सोयाबीनच्या आहेत. प्रत्यक्ष पाहणीनंतरच नुकसानीविषयी सांगता येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.