जिल्ह्यात खरीप हंगामाची लगबग सुरू ; रोप टाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:08 AM2021-06-05T04:08:37+5:302021-06-05T04:08:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात गावागावांत खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू आहे. यंदाचा माॅन्सून राज्याच्या वेशीवर येऊन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात गावागावांत खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू आहे. यंदाचा माॅन्सून राज्याच्या वेशीवर येऊन ठेपला असून, शेतकऱ्यांची भातरोप टाकणे, शेतीच्या मशागती करण्यासाठी धावपळ सुरू आहे.
जिल्ह्यात ३ लाख १४ हजार ९०५ हेक्टर क्षेत्र असून, यंदा ३४ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून बी-बियाणे रासायनिक खतांचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतकऱ्यांची खरिपाच्या तयारीची शेतात लगबग सुरू आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा तालुक्यांत काही ठिकाणी पावसाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी भातरोप टाकण्यास सुरुवात केली आहे. तर अद्यापही शेतकरी धूळवाफे करणे, शेतीची मशागत करण्यात व्यस्त आहेत.
पाऊस पडण्यापूर्वी पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकण्याच्या प्रयत्नात शेतकरी असल्याचे दिसते. खरिपात जिल्ह्यात प्रामुख्याने भात, बाजरी, मका, भुईमूग, सोयाबीन, तूर, मूग, उडीद ही पिके घेतली जातात. खरीप पेरणीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी २८ हजार ८६ क्विंटल बी-बियाणांची गरज असून, आतापर्यंत १९ हजार ४४ क्विंटल ६८ टक्के बी-बियाणांचा पुरवठा करण्यात आला आहे. तर खतांचा पुरवठादेखील पुरेसा प्रमाणात झाला आहे.