पावसाच्या प्रतीक्षेत खोळंबल्या खरीपाच्या पेरण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:08 AM2021-07-02T04:08:46+5:302021-07-02T04:08:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: राज्यातील खरीप हंगामाच्या पेरण्या पावसाने उघडीप दिल्याने थांबल्या आहेत. एकूण खरीप क्षेत्राच्या फक्त १६ टक्के ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: राज्यातील खरीप हंगामाच्या पेरण्या पावसाने उघडीप दिल्याने थांबल्या आहेत. एकूण खरीप क्षेत्राच्या फक्त १६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा आहे.
जमिनीत पुरेशी ओल तयार झाल्याशिवाय पेरणी केली जात नाही. सुरुवात चांगली केल्यावर पावसाने अचानक दांडी मारली. राज्याचे खरीपाचे एकूण क्षेत्र १४२ लाख हेक्टर आहे. त्यापैकी २२ लाख ७५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. हे प्रमाण १६.२ टक्के आहे. मागील वर्षी याच काळात एकूण खरीप क्षेत्रापैकी ५९ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. हे प्रमाण ४२ टक्के होते.
खरीपात प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, कापूस, सोयाबीन, तूर, मूग, ऊडीद ही पिके घेतली जातात. शेतजमिनीची पेरणीपूर्व मशागत करून शेतकरी पेरणीसाठी सज्ज आहेत. मात्र कमी पावसात व जमिनीत ओलावा नसताना पेरणी झाली तर बियाणे ओलीअभावी सुकून जाते. दुबार पेरणीचे संकट येते. हा धोका नको म्हणून पावसाची प्रतीक्षा होत आहे.
कोकण विभागात आतापर्यंत बऱ्यापैकी जोरदार पाऊस झाला. पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागात हलका, मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. नाशिक लातूर विभागातही पावसाचे प्रमाण अजून कमीच आहे. राज्यात आतापर्यंत सरासरी पाऊस १४५.३ मि.मी. आहे. मागील वर्षी हेच प्रमाण १७५.७० मि.मी. होते.
कृषी विभागाचे आवाहन
सुरुवातीच्या पावसात शेतकऱ्यांकडून धूळ पेरणी होते. कृषी विभागाकडून थोड्याशा पावसानंतर लगेच नेहमीच्या पेरणीची घाई करू नका, असे आवाहन करण्यात येत होते. पावसाचे आता मृग नक्षत्र येईल. सहसा मृगाच्या पावसानंतर पेरण्यांना जोराची सुरुवात होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मृगाच्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.