हलक्या पावसातही खरिपाची पेरणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:09 AM2021-07-11T04:09:14+5:302021-07-11T04:09:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जोराचा पाऊस गायबच झाल्याने हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसातच खरिपाच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. एकूण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जोराचा पाऊस गायबच झाल्याने हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसातच खरिपाच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. एकूण क्षेत्राच्या ६५ टक्के पेरण्या झाल्या असून शेतक-यांना जास्तीच्या पावसाची प्रतीक्षा आहे.
सुरुवातीला चांगला बरसलेला पाऊस नंतर गायबच झाला. त्यामुळे पेरण्या लांबल्या. मागील आठवड्यात राज्यात काही ठिकाणी हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कोकण विभागात काही ठिकाणी तर नाशिक, औरंगाबाद, पुणे व नागपूर विभागात तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. कोल्हापूर विभागात बहुतांश ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मध्यम पावसाची नोंद झाली.
पावसाची वाट पाहून शेतक-यांनी आहे त्या पावसातच खरीप हंगामाची पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील खरिपाच्या एकूण १४१ लाख ९८ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ९१ लाख ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हे प्रमाण ६४.७७ टक्के आहे. मागील वर्षी याच काळात हे प्रमाण ७६ टक्के होते.
आता भात क्षेत्रात बहुतेक ठिकाणी भात व नाचणी पिकाच्या रोपवाटिका तयार करण्याची कामे अंतिम टप्प्यात आहेत. खाचरे भरली असतील, अशा ठिकाणी लावणीही सुरू झाली आहे. सुरुवातीच्या पावसात भात लावणी केली त्याठिकाणी आता पावसाअभावी रोपे पिवळी पडू लागली आहेत.
पुढील ८ ते १० दिवसांत जोराचा पाऊस न झाल्यास आपत्कालीन नियोजन करावे लागण्याची शक्यता आहे. पेरणी व पिकांच्या पुढील वाढीसाठी आता शेतक-यांना जोराच्या पावसाची आवश्यकता आहे.