खरपुडीत तरस सैरभैर, पिंजरा लावण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:09 AM2021-09-13T04:09:20+5:302021-09-13T04:09:20+5:30
खरपुडी परिसरात वनपरिक्षेत्र परिसर आहे. दाट गर्द झाडी असल्यामुळे या वनपरिक्षेत्रात मोर, ससे, लांडगा, बिबटा, तरस या वन्यजिवांचा वावर ...
खरपुडी परिसरात वनपरिक्षेत्र परिसर आहे. दाट गर्द झाडी असल्यामुळे या वनपरिक्षेत्रात मोर, ससे, लांडगा, बिबटा, तरस या वन्यजिवांचा वावर आहे. आठ दिवसांपूर्वी एका तरसाने दोन व्यक्तींवर हल्ला करून हातापायांचे लचके तोडून गंभीर जखमी केले होते. अखेर या तरसाचा मोटारसायकलच्या धडकेत मृत्यू झाला. या परिसरात अजून तीन तरसांचा वावर आहे. हे तरस शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या निर्दशनास येत आहे. दि. ११ रोजी या परिसरात शेतकऱ्यांची मुले गेली असता तरसाने त्यांच्या पाठीमागे लागून हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलांनी पळ काढल्यामुळे मुले बचावली. तरसाने मोकाट कुत्र्यांना चावा घेऊन जखमी केले आहे.तरस सैरभैर झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
खरपुडी येथील शेतकऱ्याच्या शेतजमिनी वनपरिक्षेत्रलगत असल्याने या तरसाच्या भीतीने शेतकरी व महिला शेतकामासाठी जीव मुठीत घेऊन जात असल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांमध्ये भीतीदायक वातावरण पसरले असून तरसाचा वावर असलेल्या परिसरात काही दुर्घटना होण्याच्या अगोदर वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी खरपुडीचे माजी सरपंच संदीप गाडे, सुदाम गाडे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.