"खासदार ताई तुमचं लक्ष असू द्या" पाणी प्रश्न, पुरंदर विमानतळासह एमआयडीसीचे सुप्रिया सुळेंपुढे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 09:37 AM2024-06-06T09:37:46+5:302024-06-06T09:42:07+5:30

ओढा खोलीकरणासारख्या उपक्रमामुळे तालुका टँकरमुक्त करण्यात यश आले. मात्र, पिण्याच्या पाण्यासाठी सध्या तरी पावसावरच अवलंबून राहावे लागत आहे...

"Khasdar tai be your attention" water issue, MIDC along with Purandar airport challenge to Supriya Sule | "खासदार ताई तुमचं लक्ष असू द्या" पाणी प्रश्न, पुरंदर विमानतळासह एमआयडीसीचे सुप्रिया सुळेंपुढे आव्हान

"खासदार ताई तुमचं लक्ष असू द्या" पाणी प्रश्न, पुरंदर विमानतळासह एमआयडीसीचे सुप्रिया सुळेंपुढे आव्हान

बारामती :बारामती लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन सुप्रिया सुळे निवडून आल्या आहेत. आता सुळे यांच्यासमोर आगामी पाच वर्षांत मतदारसंघातील पाणी प्रश्नासह विविध प्रश्न सोडविण्याचे आव्हान आहे. बारामती तालुक्याचे जिरायती आणि बागायती, असे दोन भाग पडतात. त्यामध्ये बागायती भागाला नीरा डावा कालव्याचे पाणी मिळते. त्यातून बागायती भागाचे अर्थकारण जिरायतीच्या तुलनेने मजबूत आहे. जिरायती भागाला कायम अल्प पर्जन्यमानाचा फटका बसतो.

ओढा खोलीकरणासारख्या उपक्रमामुळे तालुका टँकरमुक्त करण्यात यश आले. मात्र, पिण्याच्या पाण्यासाठी सध्या तरी पावसावरच अवलंबून राहावे लागत आहे. गतवर्षी पावसाने दडी मारल्याने सध्या तालुक्यात २८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जलजीवन मिशनअंतर्गत ७७ गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाली आहे. मात्र, या योजना कार्यान्वित होईपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी पावसावर अवलंबून राहावे लागणार आहे. शिवाय जिरायती भागाचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.

या भागाला जानाई-शिरसाई या योजना खडकवासलातून शेतीच्या पाणीपुरवठ्यासाठी अस्तित्वात आल्या. मात्र, उन्हाळ्यात अपेेक्षित प्रमाणात पुरवठा होत नसल्याने शेतीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी नीरा नदीतून दरवर्षी पावसाळ्यात १० ते १५ टीएमसी पाणी वाया जाते. कर्नाटकला जाणारे हे पाणी अडवून जिरायती भागात वळविल्यास येथील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. मात्र, ही योजना खर्चीक असल्याने या योजनेच्या पूर्णत्वासाठी केंद्र सरकारचे पाठबळ लागणार आहे. यासाठी सुळे यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.

शिवाय बारामती एमआयडीसीत मोठा उद्योग आणण्याची येथील उद्योजकांची मागणी आहे. सध्या असलेल्या उद्योगांची स्थिती समाधानकारक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे रोजगारनिर्मिती आणि अर्थकारणाला चालना मिळण्यासाठी आणखी एखादा मोठा प्रकल्प या भागात उभारण्यासाठी सुळे यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. शिवाय येथील दळणवळणाला प्रोत्साहन देण्यासाठी बारामती- पुणे लोकल, तसेच बारामती- मुंबई रेल्वे सुरू करण्याची गरज आहे, तसेच पुणे ते दाैंड डेमू रेल्वेसेवा बारामतीपर्यंत वाढविण्याची गरज आहे. बारामती ते पुणे लोकल सुरू झाल्यास बारामतीचे अर्थकारण बदलण्यास मदत होणार आहे, तसेच बारामती फलटण रेल्वेमार्ग पूर्ण करण्यासाठी केंद्र पातळीवर भरीव प्रयत्न करण्याची गरज बारामतीकरांकडून व्यक्त होत आहे.

इंदापूरमध्ये गोरगरिबांवर अत्यल्प दरात सर्व रोगांवर उपचार होतील, अशा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची गरज आहे. महामार्ग असल्याने अपघातांचे प्रमाण अधिक आहे. त्यासाठी या हाॅस्पिटलची या भागात मोठी गरज आहे. तालुक्यातील नीरा नदीवरील बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याची मागणी आहे. शेटफळ हवेली व त्यासारख्या इतर तलावांतील गाळ काढून, त्यांचे खोलीकरण करावे. उजनी धरणातील गाळ काढल्यास धरणाची साठवण क्षमता १० टीमसीने अधिक वाढणार आहे. शिवाय गाळामुळे उजनी जलाशय धोकादायक बनले आहे. त्यामुळे उजनीतील गाळ काढण्याची गरज आहे.

उजनी धरणातील पाण्याऐवजी तरंगवाडी तलावातून इंदापूरकरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जावा. खडकवासला कालव्यावरील ३६ गावांमध्ये शेती सिंचन अडचणीत आहे. नीरा डावा कालव्यात भविष्यात पाणी प्रश्न गंभीर होणार आहे, या कालव्यावरील २२ गावांचा पाणी प्रश्न प्रलंबित आहे. उजनी जलाशयात अत्यल्प पाणीसाठा असल्याने उन्हाळ्यात सिंचनासाठी अडचण आहे. इंदापूर औद्योगिक वसाहतीत नवीन उद्योग आणल्यास रोजगारवाढीला चालना मिळेल. भिगवण रेल्वे स्टेशन विकास करण्यासाठी लक्ष घालण्याची गरज आहे. एक्स्प्रेस रेल्वेगाड्या येथे थांबविण्याची मागणी दुर्लक्षित आहे.

पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. भविष्यात विमानतळाच्या जागेचा प्रश्न गंभीर होत आहे. एअर ट्रॅफिकची समस्या निर्माण होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर पुरंदर विमानतळाबाबत योग्य तो निर्णय होण्याची गरज आहे, तसेच पालखी महामार्गाचे काम वेगाने करण्यासाठी केंद्र पातळीवरून प्रयत्न होण्याची गरज आहे. जेजुरीला रस्ता रुंदीकरणाऐवजी बाह्यवळण मार्ग अथवा उड्डाणपूल उभारण्याची मागणी आहे. त्याबाबत तातडीने निर्णय घेण्याची येथील व्यावसायिकांची मागणी आहे. भाेरमध्ये रोजगारवाढीला चालना मिळण्यासाठी एमआयडीसी उभारण्याची मागणी आहे.

Web Title: "Khasdar tai be your attention" water issue, MIDC along with Purandar airport challenge to Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.