खाटा उदंड जाहल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:08 AM2021-06-10T04:08:03+5:302021-06-10T04:08:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दीड महिन्यांपूर्वी शहरात असलेल्या ५५ हजारांच्या पुढील कोरोनाबाधितांची सक्रिय रुग्णसंख्या आजमितीला तीन हजारांपर्यंत कमी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दीड महिन्यांपूर्वी शहरात असलेल्या ५५ हजारांच्या पुढील कोरोनाबाधितांची सक्रिय रुग्णसंख्या आजमितीला तीन हजारांपर्यंत कमी झाली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांच्या विनंतीनुसार महापालिकेने तेथील कोरोनाबाधित रुग्णांसाठीच्या राखीव खाटा कमी करण्याचे आदेश दिले आहेत़
शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा कोरोनाबाधितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. यापैकी ५० टक्के खाटा आता अन्य रुग्णांकरिता खुल्या करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महापालिकेतील मोठ्या रुग्णालयांसह लहान रुग्णालयांमधीलही साध्या, ऑक्सिजन, आय़सीयू, व्हेंटिलेटर खाटा कोरोनाबाधितांसाठी राखीव केल्या होत्या. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्यास दोन दिवसांत या खाटा कोरोनाबाधितांसाठी राखीव ठेवण्याची सूचनाही सर्व रुग्णालयांना केली असल्याचे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी सांगितले.
महापालिका हद्दीतील खासगी रुग्णालयात १७ मे रोजी खासगी व सरकारी रुग्णालयांत मिळून एकूण १० हजार ६२४ खाटा राखीव होत्या. यात २ हजार ५६ साध्या खाटा, ७ हजार ८४ ऑक्सिजन युक्त खाटा, ६५४ आय़सीयू खाटा व ८३० व्हेंटिलेटर खाटा होत्या. यात ८ जून रोजीच्या आकडेवारीनुसार घट झाली असून टप्प्या-टप्प्याने आता कोरोनाबाधितांसाठी राखीव असलेल्या १ हजार ५५४ खाटा या अन्य रुग्णांसाठी खुल्या केल्या आहेत.
चौकट
कोरोनाबाधितांसाठीही मुबलक
“३६४ साध्या, १ हजार ९७ ऑक्सिजन, ३० आयसीयू व ६३ व्हेंटिलेटर खाटा कोरोनाग्रस्त नसलेल्या रुग्णांना अन्य उपचारासाठी खुल्या झाल्या आहेत. कोरोना रुग्णसंख्या सातत्याने घटत असून ३३ लहान रुग्णालयांनी कोरोनाबाधितांच्या राखीव खाटा पूर्णपणे अन्य रुग्णांसाठी खुल्या केल्या आहेत. असे असले तरी ताज्या आकडेवारीनुसार शहरात सरकारी व खासगी मिळून ९ हजार ७० खाटा आजही कोरोनाबाधितांसाठी राखीव आहेत.”
-डॉ. मनीषा नाईक, सहायक आरोग्य प्रमुख, महापालिका