बिबवेवाडीच्या "ईएसआयसी हॉस्पिटल"च्या खाटा पालिका घेणार ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:11 AM2021-04-07T04:11:37+5:302021-04-07T04:11:37+5:30
पुणे : महापालिकेकडून शहरातील विविध रुग्णालयायांमधील खाटा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोविड रुग्णांसाठी अधिकाधिक खाटा उपलब्ध करून देण्याचा ...
पुणे : महापालिकेकडून शहरातील विविध रुग्णालयायांमधील खाटा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोविड रुग्णांसाठी अधिकाधिक खाटा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पालिकेने बिबवेवाडीतील ''एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन'' (ईएसआयसी) रुग्णालयाशी संपर्क साधून त्यांच्याकडील खाटा कोविड उपचारांसाठी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. रुग्णालय प्रशासनाने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून येथे १०० खाटा उपलब्ध होणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली.
ईएसआयसी रुग्णालयात ७० ऑक्सिजन खाटा आहेत. त्यांना पालिकेकडून ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे. याठिकाणी किचन, लॉड्रीची व्यवस्था केली जाणार आहे. अत्यवस्थ आणि ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या वाढत चालल्याने खाटांची संख्या कमी पडू लागली आहे. डॅशबोर्डावरील माहितीनुसार ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटरयुक्त खाटा उपलब्ध नसल्याचे दिसत आहे. पालिकेच्या कोविड हेल्पलाईनद्वारेही खाटा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक घाबरून जात आहेत.
खाटांची संख्या वाढविण्याशिवाय प्रशासनासमोर पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे छोट्या मोठ्या रुग्णालयांमधील खाटा कोविडसाठी उपयोगात आणण्याच्या प्रयत्नात प्रशासन आहे. बिबवेवाडीतील इएसआयसी रुग्णालयामध्ये उपलब्ध असलेल्या ७० ऑक्सिजन खाटा ताब्यात घेण्यात येणार असून त्यामध्ये आणखी ३० खाटांची भर टाकली जाणार आहे.