खेड विमानतळासाठी कोये, कडूसला पाहणी
By admin | Published: September 3, 2016 03:13 AM2016-09-03T03:13:27+5:302016-09-03T03:13:27+5:30
खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील कोये, कडूस, धामणे परिसरामधील जागेची विमानतळ प्राधिकरणाच्या पथकाने शुक्रवारी पोलीस बंदोबस्तामध्ये पाहणी केली.
पाईट : खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील कोये, कडूस, धामणे परिसरामधील जागेची विमानतळ प्राधिकरणाच्या पथकाने शुक्रवारी पोलीस बंदोबस्तामध्ये पाहणी केली.
खेड तालुक्यामध्ये नियोजित विमानतळ होणार असल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर, खेड तालुक्यामधील कोणत्या जागेत नियोजित विमानतळ होणार, हे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या पथकाने पाहणी केल्यावर स्पष्ट होईल, असे सांगितले होते; तसेच विमानतळ प्राधिकरणाचे पाहणी पथक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही पाहणी करणार, असे जाहीर केले होते.
नियोजित ठरल्याप्रमाणे शुक्रवारी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या समवेत आलेल्या विमानतळ प्राधिकरणाच्या ७ ते ८ अधिकाऱ्यांच्या पथकाने कडूस, कोये व धामणे परिसराची पाहणी केली. या वेळी पथकासमवेत विश्वास पाटील, प्रांताधिकारी हिंमत खराडे, मावळचे प्रांताधिकारी सुनील थोरवे, उपविभागीय पोलीस अधिकारी मितेश गट्टे, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी व मोठ्याा प्रमाणावर पोलीस या वेळी उपस्थित होते.
या सुरुवातीस हे पथक कडूसमार्गे येऊन कोये गावच्या हद्दीमधील भिसांबा ठाकरवाडीजवळील टेकडीवरून कडूस, पाईट, कोये, गारगोटवाडी परिसराची सुमारे तासभर पाहणी केली. यानंतर पथक पाईटमार्गे धामणे परिसरातील धामणे गावच्या रस्त्यावर वाहने उभी करून पाहणी केली. या वेळी मोठ्या प्रमाणावर परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
विमानतळ ‘सेझ’मध्ये होणार असल्याचे जाहीर केले; पण पाहणीमात्र पाईट, कोये, धामणे परिसराची करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, विमानतळ नक्की कोठे होणार, याबाबत संभ्रम कायम आहे. (वार्ताहर)
जागेचा पुन्हा संभ्रमच!
खेड तालुक्याच्या पूर्व भागातील सेझ परिसरात विमानतळ जागेची पाहणी करण्यासाठी येणारे पथक शुक्रवारी या परिसरात फिरकलेच नाही. सेझ बाधित शेतकरी दिवसभर पथकांची वाट पाहत ताटकळत होते. कडूस-कोये येथील जागेची पाहणी केली. त्यामुळे विमानतळासाठी नेमकी कोणती जागा निश्चित होणार, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.