खेड, जुन्नरला अवकाळीचा फटका
By admin | Published: February 10, 2015 11:59 PM2015-02-10T23:59:56+5:302015-02-10T23:59:56+5:30
: जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील उदापूर, डिंगोरे, मांदारणे, शिंदेवाडी, बनकरफाटा तसेच इतर वाड्या-वस्त्यांवर मुसळधार पाऊस झाला.
मढ : जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील उदापूर, डिंगोरे, मांदारणे, शिंदेवाडी, बनकरफाटा तसेच इतर वाड्या-वस्त्यांवर मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी हलक्या गाराही पडल्या. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात कांदे, गाजर, मेथी, कोथिंबीर, घेवडा, वांगी, गहू, हरभरा तसेच विविध प्रकारच्या पालेभाज्या ही पिके आहेत. पावसामुळे कांदा व तत्सम पिकांवर डावणी, करपा, मावा या रोगांचा प्रादुुर्भाव होणार आहे. नारायणगाव परिसरात २० मिनिटे पाऊस झाला.
चाकण : चाकण व परिसरात पावसाने झोडपून काढले. काही ठिकाणी लहान गारा पडल्या. खराबवाडीत पावसात चिमुकल्यांनी गारा वेचण्याचा आनंद लुटला. चाकणसह खराबवाडी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, कडाचीवाडी, महाळुंगे, खालुंब्रे, सावरदरी, शिंदे, वासुली, भांबोली, वराळे, कोरेगाव, आंबेठाण, बिरदवडी, गोनवडी, बोरदरा, पिंपरी, भाम, कुरुळी, चिंबळी, मोई, निघोजे, वाकी, काळूस, रासे, भोसे परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. चाकणच्या कोहिनूर सेंटरमध्ये पावसाने पाण्याचे तळे साचले होते. तब्बल अर्धा ते पाऊण तास पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
काळूस : खेड तालुक्याच्या मध्यपूर्व भागात अचानक झालेल्या अवकाळी पावसाने कांदापिकाचे नुकसान केले.
संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास तालुक्याच्या वाकी, काळूस, खरपुडी, भोसे, शेलगाव, शेटफळ परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
घोडेगाव : आंबेगाव तालुक्यात घोडेगाव परीसरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गारांचा पाऊस पडला. पंधरा ते विस मिनीट पडलेल्या या पावसाने सगळयांचीच धावपळ करून टाकली. कांदा, आंबा पिकांना मोठा फटका बसणार आहे. गारपीट झाल्यानंतर अनेक ठिकाणी आंब्याचा मोहर गळून पडलेला दिसत होता तर या गारपीटीमूळे कांदा वाढीला मोठा मार बसणार आहे. आधीच विविध रोगराईने चिंताग्रस्त असलेल्या बळीराजाची चिंता अधिक दृढावली आहे. (वार्ताहर)