खेड पंचायत समिती सभापतीचा सदस्यांवर गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:09 AM2021-05-28T04:09:50+5:302021-05-28T04:09:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अविश्वास ठराव दाखल केल्याने चिडलेल्या खेड तालुका पंचायत समितीचे शिवसेनेचे विद्यमान सभापती भगवान पोखरकर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अविश्वास ठराव दाखल केल्याने चिडलेल्या खेड तालुका पंचायत समितीचे शिवसेनेचे विद्यमान सभापती भगवान पोखरकर यांनी त्यांच्याच पक्षाच्या महिला आणि पुरुष सदस्यांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना खडकवासला येथे घडला आहे. दहशत माजविण्यासाठी गोळीबारही केला. खेड पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीवरून हा वाद झाला आहे.
याप्रकरणी हवेली पोलिसांनी सभापती भगवान नारायण पोखरकर, जालिंदर नारायण पोखरकर, केशव आरगडे व इतर १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी यातील एक आरोपी प्रकाश ऊर्फ पप्पू मारुती पोखरकर (रा. वाळज, ता. खेड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना डोणजे परिसरातील हॉटेल वाईल्डर नेस्टमध्ये गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी प्रसाद दशरथ काळे (वय २८, रा. गोलेगाव, ता. खेड) यांनी हवेली पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
खेड तालुक्यातील पंचायत समितीचे विद्यमान सभापती भगवान पोखरकर यांचा सभापतिपदाचा निर्धारित कार्यकाळ संपूनदेखली त्यांनी सभापतिपदाचा कार्यभार न सोडल्याने पंचायत समितीचे शिवसेना व मित्र पक्षाच्या सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, शिवसेनेचे ६, भाजपचा १ असे ११ पंचायत सदस्यांनी पोखरकर यांच्याविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. त्याबाबत ३१ मे रोजी बहुमत सुनावणी होणार आहे. हे सर्व सदस्य त्यांच्या कुटुंबीयांसह खडकवासला येथील हॉटेल वाईल्डर नेस्ट या हॉटेलमध्ये २६ मे रोजी येऊन राहिले. हे सर्व जण आपल्याविरुद्ध वातावरण तापवित असल्याने पोखरकर यांनी चिडून पंचायत सदस्य मच्छिंद्र गावडे यांच्या घरातील लोकांवर दबाव आणून महाळुंगे पोलीस चौकी येथे गावडे यांस अंकुश राक्षे यांनी पळवून नेल्याची तक्रार दिली. तसेच अक्षय पोटे याला सदस्य अरुण चौधरी यांचा पुतण्या आशीष चौधरी याने हॉटेलवर असलेल्या सदस्यांना धमक्यांचे फोन येतात, त्यांना भीती असल्याने ते सर्व जण डोणजे येथील हॉटेलवर आले होते. गुरुवारी पहाटे ५ वाजता तीन ते चार गाड्या आल्या. त्यामधून १५ ते २० लोक खाली उतरले. हॉटेलच्या मेनगेटवर येथून गेट तोडून आतमध्ये घुसले. त्यांचे हातात लाेखंडी रॉड, काठ्या, खंजीरसारखे चाकू होते. त्यांनी हॉटेलच्या सुरक्षारक्षकाला मारहाण केली. हॉटेलमधील खोल्यांचे दरवाजे तोडले. त्यांनी दिसले त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यात प्रसाद काळे यांच्या हाताला जखम झाली. अनेकांना बेदम मारहाण केली. त्यांनी तेथे थांबलेल्या पंचायत समिती सदस्यांना मारहाण करून त्यांच्याबरोबर असलेल्या महिलांशी गैरवर्तन केले. जालिंदर पोखरकर याने पिस्तूल काढून हवेत गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सर्वांना त्यांनी गाड्यांमध्ये बसवून त्यांचे अपहरण केले. त्यांना काही अंतरावर नेऊन सोडून दिले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील, उपअधीक्षक राहुल आवारे यांनी घटनास्थळाला भेट दिली. आरोपींच्या शोधासाठी विविध ठिकाणी तपास पथके पाठविण्यात आली असून, पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार अधिक तपास करीत आहेत.
पुण्यातील डोणजे गाव परिसरातील डोंगरावरील एका खासगी रिसॉर्ट येथे हा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. भगवान पोखरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याची धक्कादायक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.