खेड शिवापूर टोलनाका बनावट पावत्या प्रकरणात दोघांना जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:15 AM2021-08-27T04:15:32+5:302021-08-27T04:15:32+5:30
पुणे : खेड शिवापूर टोलनाक्यावर बनावट पावत्या देऊन वाहनचालक आणि शासनाची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या दोघांना १५ हजार रुपयांच्या ...
पुणे : खेड शिवापूर टोलनाक्यावर बनावट पावत्या देऊन वाहनचालक आणि शासनाची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या दोघांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. निमसे यांनी हा आदेश दिला.
मनोज ऊर्फ दादा गजानन दळवी (वय ३१, रा. पिराचा मळा, भोर) आणि सतीश सुरेश मरगजे (वय ४१, रा. करवंडी, ता. भोर) अशी दोघांची नावे आहेत. त्यांनी ॲड. विवेक भरगुडे, ॲड. बाळासाहेब भोसले, ॲड. राकेश ओझा आणि ॲड. सागर गायकवाड यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.
गुन्ह्यात एकूण चौदा जणांवर गुन्हा दाखल असून, पोलिसांनी ३१ टोल पावत्या, २ मॉनिटर, २ प्रिंटर, १ की-बोर्ड, रोख रक्कम असा १ लाख २ हजार ६७० रुपयांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणात पोलिसांनी अटक केल्यानंतर दोघांना न्यायालयाने सुरुवातीला पोलीस कोठडी, त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर जामिनासाठी अर्ज केला. दोघे स्टाफ मॅनेजर म्हणून कार्यरत होते. स्टाफ लोकांची ड्यूटी रेंज करण्याचे काम होते. वरिष्ठ सांगतील त्याप्रमाणे वागत होतो. त्या पावत्यांचे काय झाले, याबाबत दोघांनाही माहिती नसल्याचा युक्तिवाद ॲड. विवेक भरगुडे यांनी केला.