खेड शिवापूर टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन, वाहतुक विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 06:12 PM2018-06-01T18:12:53+5:302018-06-01T18:12:53+5:30
शेतकऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनाच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पुणे: खेड शिवापूर टोल नाक्यावर विविध पिके तसेच दूध ओतून शेतकऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनाच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी टोमॅटो, कांदा, दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. शेतकऱ्यांच्या देशव्यापी संपाला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी(दि.१जून) पाठिंबा देण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे जिल्हा महिलाध्यक्षा वैशाली नागवडे, खडकवासला विधानसभा अध्यक्ष काकासाहेब सचिन घोटकुले,कोंढणपुरचे सरपंच संदीप मुजुमले, रणजित शिवतरे, रणजित शिवतरे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कामठे म्हणाले, एकीकडे शेतकऱ्यांना हमी भाव देऊ असे सरकार सांगते पण सध्याची वस्तुस्थिती वेगळी आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना फसवले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बळीराजा स्वाभिमान आंदोलन करावे लागतेय. सध्या इंधनाचे दर गगनाला भिडले आहे. त्यामुळे सामान्य नागरिक हैराण झाला आहे. दुसरीकडे कांदा, तूर, सोयाबीन, ऊस, इतर पिकांना हमीभाव सरकार देत नाही, ही चक्क शेतकऱ्यांची फसवणूक आहे. सरकार जर शेतकऱ्यांची फसवणूक करत असेल तर सरकारचा गळा चिरण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे हे त्यांनी विसरता कामा नये. यावेळी टोमॅटो, कांदा, दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध करण्यात आला.