खेड शिवापूरला आता नवीन टोलनाका
By admin | Published: December 20, 2015 02:22 AM2015-12-20T02:22:36+5:302015-12-20T02:22:36+5:30
पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर येथील टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा ही नित्याचीच बाब झाली होती, याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातल्यामुळे नित्याची
नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर येथील टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा ही नित्याचीच बाब झाली होती, याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातल्यामुळे नित्याची होणारी वाहतूककोंडी आता कमी झाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सध्याच्या टोलनाक्यापासून ३०० मीटर अंतरावर आणखी एक टोलनाका उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे टोल भरताना जाणारा वेळ आणि वाहनांचे इंधन वाचेल.टोलनाक्यावर वाहनांना तीन मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागू नये याकरिताच या टोलची निर्मिती होत आहे. या नवीन टोलचे काम पूर्ण झाल्यानंतर एका टोलवर सातारा बाजूकडे तर दुसऱ्या टोलवरून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांचा टोल वसुलीसाठी वापरला जाणार आहे. कंपनी व्यवस्थापनाने दोन वर्षांपूर्वी या टोलनाक्याशेजारी अजून एक टोलनाका उभारण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी दिल्ली येथील वरिष्ठ कार्यालयाला पाठविला होता. त्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याने गेल्या चार महिन्यांपासून तेथे काम सुरूझाले आहे. सुट्टीच्या वेळी अनेक वाहनांवर या टोलनाक्यावर वाहनांच्या रांगांत अनेक वेळा अडकून राहण्याची वेळ येते. सध्या असलेल्या टोलनाक्यावर बारा लेन आहेत. यापैकी सातारा बाजूकडे जाणाऱ्या नव्या टोलवर दहा लेन तर पुणे बाजूकडे जाणाऱ्या जुन्या टोलवर दहा लेन असणार आहेत. नवीन टोलनाक्याचे काम लवकरात लवकर झाल्यास टोलनाक्यावरील वाहतूककोंडीचा प्रश्न सुटणार असून, वाहनांची वाहतूक सुलभ होईल असे व्यवस्थापक कृष्णा राव यांनी सांगितले.